धाऊलवल्लीत बिबट्या जेरबंद

By Admin | Published: August 28, 2015 12:00 AM2015-08-28T00:00:34+5:302015-08-28T00:00:34+5:30

फासकीत अडकला : वनविभागाने सुरक्षितस्थळी सोडले

Dibalwali leopard jerband | धाऊलवल्लीत बिबट्या जेरबंद

धाऊलवल्लीत बिबट्या जेरबंद

googlenewsNext

राजापूर/ जैतापूर : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गयाळ कोकरी येथे डुकराच्या शिकारीकरिता लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला गुरुवारी वनविभागाने सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद करुन नैसर्गिक अधिवासात सोडले.गयाळ कोकरी येथील सुनील सखाराम राणे यांच्या आंबा कलमाच्या बागेत लावलेल्या फासकीत हा बिबट्या अडकला होता. सुनील राणे यांच्या बागेत काम करणारे कामगार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामासाठी बागेत गेले असताना बिबट्या फासकीत अडकल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ सुनील राणे यांना खबर दिली. राणे यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने फासकीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद केले. चिपळूण विभागीय वनअधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी वनक्षेत्रपाल बी. आर. पाटील, राजापूर वनपाल सु. ग. गुरव, वनरक्षक सागर गोसावी, रत्नागिरी वनरक्षक गावडे यांच्यासह विजय म्हादये, दीपक म्हादये, दीपक चव्हाण, आदींनी मेहनत घेतली. बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी नम्रता नाकोड यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
दरम्यान, मादी जातीचा बिबट्या असून, ती सुमारे चार वर्षे वयाची आहे, तर बिबट्याची लांबी १५५ सेंमी. व रुंदी ६५ सेंमी. असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

कारवाई होणार ?
शासनाने काही महिन्यांपूर्वी फासकी लावलेली आढळल्यास संबंधित जागामालक आणि फासकी लावणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, प्रत्यक्षात तसे होतच नाही. राजापुरातील प्रकरणही असेच थंड होणार की काय? असा सवाल केला जात आहे.

पोलिसांचा उद्धटपणा
याबाबत वनपाल सुधाकर गुरव यांनी सांगितले की, याबाबत नाटे ग्रामीण पोलीस ठाण्यालाही रीतसर कळविण्यात आले होते.
मात्र, ग्रामीण पोलीस ठाण्याचा कही अधिकारी वा पोलीस हजर झाला नाही. उलट आम्ही पाठविलेल्या प्रतिनिधीला वाईट वागणूक देण्यात आली, असे ते म्हणाले.

Web Title: Dibalwali leopard jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.