पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी शब्दकोष

By admin | Published: June 10, 2015 11:09 PM2015-06-10T23:09:55+5:302015-06-11T00:35:42+5:30

काम अंतिम टप्प्यात : जिल्हा परिषद शिक्षण समिती सभेत माहिती

Dictionary for children from 1st to fifth class | पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी शब्दकोष

पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी शब्दकोष

Next

सिंधुदुर्गनगरी : सर्वशिक्षा अभियानांतर्गत ३० वर्गखोल्या मंजूर असून त्यापैकी २९ वर्गखोल्यांचे बांधकाम सुरु असून मसुरे वर्गखोलीचे काम अद्याप सुरु झाले नसल्याची माहिती बुधवारी शिक्षण समिती सभेत देण्यात आली. तसेच पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागामार्फत शब्दकोष तयार करण्यात येत असून शब्दकोषाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी सदस्या सुषमा कोदे, वैशाली रावराणे, समिती सचिव तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी एस. के. देसाई, खातेप्रमुख अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
१५ जूनला सर्व प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव
प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी १५ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी १४ जून रोजी सर्व शिक्षकांनी शाळेत सकाळी ७ वाजता उपस्थित राहून लोकप्रतिनिधी, बचतगट, सहकारी संस्था, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने शाळा व परिसर स्वच्छता करावी, शाळेचे प्रसन्न वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीने सजावट करावी, त्याचप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जूनला सकाळी ७ वाजता उपस्थित राहून गावातून प्रभातफेरी काढावी. शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्याची विनंती करावी. त्यानंतर १० वाजता नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. समारंभपूर्वक सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संचाचे वाटप करावे असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत नियोजन करावे असे आदेश सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी शिक्षण समिती सभेत दिले.
४ जुलैला शाळाबाह्यांचे सर्व्हेक्षण
१४ वर्षांखालील प्रत्येकाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. ४ जुलै रोजीच्या शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण कार्यक्रमात सर्व्हेक्षण प्रतिनिधी प्रत्येक घर, कुटुंबाना भेटी देतील. तेथील शाळाबाह्य मुलांची माहिती घेतील. तपासण्यात आलेल्या मुलांच्या बोटावर निवडणुकीप्रमाणे शाईने खूण करतील. जेणेकरून एकही शाळाबाह्य मूळ सर्व्हेक्षणातून चुकू नये याची दक्षता घेणार आहेत. या सर्व्हेक्षण कार्यक्रमाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण प्रशासनाने केले
आहे. (प्रतिनिधी)


२१ जून रोजी योगा दिन
जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात यावा. विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून द्यावे.
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त दिलेल्या सूचनेनुसार सर्व शाळांनी एक तासाचे योगा प्रशिक्षण घ्यावे.
योगाबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना या सभेत देण्यात आल्या.

Web Title: Dictionary for children from 1st to fifth class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.