सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल

By सुधीर राणे | Published: December 28, 2023 04:38 PM2023-12-28T16:38:44+5:302023-12-28T16:39:42+5:30

शिंदे-ठाकरे भेटीने महाराष्ट्राला फायदा

Did Siddhivinayak temple become Thackeray own property, asked Nitesh Rane | सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल

सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल

कणकवली: कोरोना काळात फक्त उद्धव ठाकरे  व पाटणकर कुटुंब यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन सुरू ठेवले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गणपती पूजेसाठी सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी ११ दिवस ठेवले होते. त्यामुळे सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का? असा सवाल करतानाच इतरांवर टीका करताना संजय राऊत यांनी त्यावर प्रथम बोलावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. 

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गुरुवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राम मंदिर कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून थयथयाट करणे संजय राऊत यांनी थांबवावे. आमंत्रणावरून आम्ही कधी राजकारण केले नसल्याचे राऊत सांगत आहेत. मात्र, यापूर्वी त्यांचा पक्ष सत्तेत असताना मेट्रो, बाळासाहेब स्मारक भूमिपूजन अशा कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस यांना का डावलले होते? मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी या कामांना गती दिली होती आणि मंजूरीपण दिली होती.

कोणाला अयोध्येला बोलवावे हे प्रभू श्रीरामाने ठरविले आहे. तुमच्या सारख्या लोकांचे कर्तृत्व पाहून तिथे तुम्हाला बोलवलेले नाही. राहुल गांधींचा पुन्हा एकदा फ्लॉप शो सुरू होत आहे. राऊत यांनी तिकडे जावे. कारण जेथे राहुल गांधींची यात्रा जाणार तेथे काँग्रेस पराभूत होणार हे निश्चित आहे. 

आमच्या देवाला कोणीही किडण्याप करू शकत नाही. ५०० वर्षा पासून असलेली राम मंदिराबाबतची जनतेची इच्छा आता पूर्ण झाली आहे. हे राऊत यांच्या सारख्याना कळणार नाही. दुसऱ्यांच्या उद्योग समूहावर बोलण्यापेक्षा पाटणकर यांच्याबाबत संजय राऊत यांनी आधी बोलावे.

शिंदे-ठाकरे भेटीने महाराष्ट्राला फायदा
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. राज ठाकरे हे सातत्याने सामाजिक विषय उचलत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे या दोघांच्या भेटीने महाराष्ट्र राज्याचा फायदाच होईल. असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. तर आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल ते म्हणाले, कोणी ही त्यांच्या सोबत चहा घेतली, बिर्याणी खाल्ली तरी ते महायुती सोबतच राहणार आहेत. हे लक्षात ठेवावे. असेही ते म्हणाले.

Web Title: Did Siddhivinayak temple become Thackeray own property, asked Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.