दीपकभाई याला पोलिसांची दहशत म्हणायची की काय?
By admin | Published: September 11, 2016 12:38 AM2016-09-11T00:38:16+5:302016-09-11T00:49:09+5:30
साळगावकरांचे मुद्दे दुर्लक्षित न करण्याजोगे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवादाच्या मुद्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री व तत्कालिन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी सन २0१३-१४ मध्ये रान उठविले होते. तत्कालिन पालकमंत्री व काँग्रेस नेते नारायण राणे आणि त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांच्या दहशतवादाचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत असायचा. त्या काळातील प्रत्येक निवडणूक ही दहशतवादाच्या एकमेव मुद्यावर लढली जात होती. सिंधुदुर्ग आणि राजकीय दहशतवाद असे वातावरण निर्माण केले जायचे. त्याचा बराचसा राजकीय फायदा केसरकरांना झाला.
पक्ष बदलून राणेंच्या विरोधात बंड पुकारत त्यांनी २0१४ मधील लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका लढून विजयश्री मिळविली. त्यामागे त्यांचे कष्टदेखील होते. हे तेवढेच खरे आहे. गेली दोन वर्षे दीपक केसरकर हे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवित आहेत. तर आता महिन्याभरापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना राज्याचे गृहराज्यमंत्रीपदही देण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या खांद्यावर राज्यातील जनतेच्या सुरक्षेची आणि कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. दीपकभार्इंकडे असणाऱ्या गृहखात्यातील पोलिसांच्या उद्दामपणाची अनेक उदाहरणे सध्या सिंधुदुर्गात घडत आहेत. त्यामुळे आता दीपकभाई याला पोलिसांचा दहशतवाद म्हणायचा की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. आणि आता हा दहशतवाद मोडीत कोण काढणार? लोकांमध्ये पोलिसांबाबत असलेली सहानुभूती पुन्हा निर्माण करण्यासाठी कोण प्रयत्न करणार ? तसे प्रयत्न दीपक केसरकर यांनी करावे अन्यथा त्याबाबतचा जाब येथील जनता आगामी काळात केसरकरांनाही विचारायला मागे पुढे पाहणार नाही.
विरोधी पक्षात असताना कोणताही लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या नावे टाहो फोडू शकतो. मात्र, तो ज्यावेळी सत्तेत जातो. त्यावेळी त्याला जनतेबरोबरच विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि त्याचबरोबरीने आपण विरोधी पक्षात असताना केलेल्या टीका टिप्पणीच्या मुद्यांना घेऊन त्यावर उपाययोजना आखायच्या असतात. दीपक केसरकर हे निष्णात राजकारणी म्हणून परिचित आहेत. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असली तरी खाकीबाबत वेळोवेळी होणारी बदनामी शोभनीय नाही. त्यामुळे खाकीमधील दहशतवाद वाढत जातोय, अशी भावना सर्वसामान्यांत निर्माण होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांत दर पंधरा दिवसांनी सिंधुदुर्गातील पोलिसांच्या नाकर्तेपणा, भ्रष्ट कारभार आणि आपल्याला हवा तसा कायदा हातात घेण्याची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्याचे दीपकभाई सुपुत्र आहेत. त्या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला वठणीवर आणण्याची पाळी आता त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. गेल्या दोन महिन्यात कणकवली म्हणा किवा सावंतवाडी या जिल्ह्यातील दोन महत्वाच्या शहर आणि परिसरात घडलेल्या काही घटनांचा तपशील पाहता पोलिस आणि जनतेमधील नाते दुरावण्याची स्थिती आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहाय’ म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांवर वचक ठेवण्यासाठी असे स्लोगन लावून जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेले पोलिस खरचं प्रामाणिकपणे असे वागतात का हे शोधावे लागेल. अन्याय झाल्याचा गुन्हा दाखल करून घेण्याससुद्धा पोलिस कशी टाळाटाळ करतात याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, खाकीचा बडगा दाखवून तडजोडपाणी करणारे महाभाग या विभागात कमी नाहीत.
यासाठी अलीकडील तीन उदाहरणे काफी आहेत. त्यातील पहिले उदहारण म्हणजे, कणकवली बाजारपेठेत पार्क करून ठेवलेली दुचाकी दुसरा एक दुचाकीस्वार आपली म्हणून चुकीने घेऊन गेला. गाडीच्या मालकाला आपली दुचाकी चोरीस गेली असे वाटल्यामुळे त्याने थेट पोलिस ठाणे गाठले. चुकून घेऊन गेलेल्या त्या माणसाच्या चूक लक्षात आल्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात गाडी आणून दिली.
गाडी मालकाला कळल्यावर त्याने कागदपत्रांची मागणी केली. त्या गाडी मालकाने कागद सादर केले. मात्र, उपस्थित सराईत पोलिसाला यात वेगळाच अर्थपूर्ण वास आला आणि त्याने कागदपत्रांची मागणी केली. त्याचे ईप्सित उधळत असल्याने त्या पोलिसाने विम्याच्या पावतीची मागणी केली. मात्र, विमा भरलेला नसल्याने मालक ती देऊ शकला नाही. पोलिसाने गाडी ताब्यात दिली मात्र कागद दिले नाहीत. त्यासाठी त्याने १५ हजार रूपयांची मागणी केली. बिचारा मालक बिथरला. यापेक्षा गाडी चोरीला गेली असली तरी चालले असते असे त्याला क्षणभर वाटले. त्यानंतर याबाबत वर्तमान पत्रे आणि स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतर या पोलिसाला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबीत केले.
यानंतर कणकवलीतच १४ आॅगस्ट दरम्यान घडलेल्या आणखीन एका महत्त्वाच्या घटनेतही पोलिसांचा बेजबाबदारपणा पुढे आला. अंबरनाथ येथील खंडणीखोर पोलिसांविरोधात कणकवली येथील शीतल सावंत या महिलेची तक्रार घेण्यास कणकवली पोलिसांना चार दिवस लागले. या गैरकृत्यात पोलिसच पोलिसांच्या मदतीला धावून गेले. अंबरनाथहून कणकवलीत आलेल्या पोलिसांच्या टोळक्याने खंडणी घेतली. या विषयात शीतल सावंत यांनी पोलिसांचे उंबरठे झिजवले मात्र, शेवटपर्यंत त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही. ही घटना खाकीला वर्दीला शोभेची तर नव्हती. शीतल सावंत यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगात त्यांना कणकवली पोलिसांना मदत तर केली नाही, याऊलट पोलिस ठाणे झिजवायला लावले.
तिसरी आणि अतिशय महत्त्वाची घटना म्हणून उल्लेख करावा लागेल. कारण ही घटना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर राहत असलेल्या सावंतवाडी शहरातीलच आहे. सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष नांदोस्कर आणि हवालदार सचिन सावंत या दोघांनी खोटी केस दाखल करून ‘आयटीआय’मध्ये शिक्षण घेत असलेला शुभम विष्णू केदार व त्यांचे वडील विष्णू केदार यांच्यावर गुन्हा दाखल करून तब्बल सात महिन्यानंतर अटक केली. नांदोसकर यांनी आपल्या मुलाला वाचविण्यासाठी हा खटाटोप केला आहे. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई अन्यथा प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सावंतताडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.
गेल्या दोन महिन्यात घडलेल्या या तीन महत्त्वाच्या घटना ज्या सिंधुदुर्ग पोलिसांची कार्यप्रणाली स्पष्ट करणाऱ्या ठरल्या आहेत. आणखीन अशा अनेक घटना असतील मात्र, त्यावर कोण प्रकाशझोत टाकणार. या घटना शीतल सावंत यासारख्या डॅशिंग महिला, स्थानिक लोकल चॅनलची सतर्कता आणि बबन साळगावकर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीमुळे पुढे आल्या आहेत. या सर्व घटनांमुळे येथील खाकीची झालेली बदनामी दूर करण्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.
साळगावकरांचे मुद्दे दुर्लक्षित न करण्याजोगे
बबन साळगावकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मग्रुरीबाबत आवाज उठविला.
बबन साळगावकर हे गेली २५ वर्षे सावंतवाडीत राजकारणात सक्रीय काम करीत आहेत.
त्यांनी सामाजिक भान ठेऊन अनेक प्रकरणे हाताळली आहेत.
उगाचच राजकीय टिकाटिप्पणी करून प्रसिद्धी मिळविण्याच्या मागे ते नसतात.
त्यामुळे खाकीतील त्या अधिकाऱ्यांनी शुभम केदार व त्याच्या वडिलांना खोट्या केसेस दाखल करून मांडलेल्या छळवणुकीतून त्यांची सुटका होण्यासाठी केदार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आयटीआयमध्ये शिक्षण घेणारा शुभम केदार याच्यावर याचावर अपघाताबाबतचा गुन्हा पाच महिन्यानंतर दाखल करण्यात आला आहे.
यासाठी या पोलिसांनी तब्बल २0 साक्षीदार देण्यात आले आहेत आणि ते तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील आहेत.
या साक्षीदारांमध्ये डॉक्टर, फोटोग्राफरांचा समावेश आहे.
त्यामुळे अगदी हेतुपुरस्कृत गुन्हा दाखल करून केदार कुटुंबीयांना अडकविण्यासाठी नांदोस्कर आणि सावंत यांनी हा डाव रचला आहे.
त्यामुळे केदार कुटुंबीयांवर खाकी अन्याय करत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी सावंतवाडीचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वीकारली आहे.
गणेशोत्सवादरम्यान, दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील या दोन्ही पोलिसांची खात्याअंतर्गत चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
ही चौकशी होईल, मात्र, सध्यस्थितीत पोलिसांमध्ये अशाप्रकारे जनतेची पिळवणूक करण्याची जी भावना फोफावत आहे. त्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘खाकीतील’ हा दहशतवाद संपवायलाच हवा, एवढे मात्र, निश्चित.