‘हापूस’च्या मानांकनाला खोडा
By admin | Published: June 5, 2016 12:04 AM2016-06-05T00:04:06+5:302016-06-05T00:04:06+5:30
कोकण कृषी विद्यापीठाचा अडथळा : अजित गोगटे, सुधीर जोशींचा आरोप
देवगड : देवगड हापूसला जीआय मानांकन मिळण्यासाठी येथील शेतकरी झटत आहेत. जीआय मानांकन मिळाल्यास देवगडच्या नावाखाली कर्नाटक आणि तत्सम दर्जाहीन आंब्याच्या विक्रीला कायदेशीर लगाम घालण्याची ताकद शेतकऱ्यांना मिळेल. असे असताना
जी आय मानांकन मिळण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ अडथळा आणून खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका माजी आमदार अजित गोगटे व सुधीर जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
जामसंडे खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेला जामसंडेचे माजी सरपंच राजा भुजबळ व देवगड तालुक्यातील बागायतदार उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना अजित गोगटे, सुधीर जोशी म्हणाले, देवगड हापूसच्या जीआय अर्जावर ६ जून रोजी मुंंबईमध्ये जीआय कार्यालयात सुनावणी आहे. परंतु देवगड हापूसला हे जीआय नामांकन मिळू नये म्हणून गेली चार वर्षे प्रयत्न करणारे कोकण कृषी विद्यापीठ या सुनावणीमध्ये खोडा घालण्याच्या तयारीत आहे, असे समजते. सर्व ठिकाणचा हापूस हा एकसमानच आहे, असा विचित्र युक्तीवाद करून कोकण कृषी विद्यापीठाने गेली चार वर्षे देवगड हापूसच्या जीआय मानांकनाच्या अर्जात अडथळा निर्माण करून ठेवला आहे. विशेष म्हणजे हा जगावेगळा युक्तीवाद मांडणारे विद्यापीठाच्या बागायती विभागाचे प्रमुख बी. आर. साळवी हे आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे देवगड हापूसची वैशिष्ट्ये सांगणारे काही संशोधन पेपर त्यांच्या विभागाने प्रकाशित केले होते पण आता त्यांचे उल्लेख विद्यापीठाच्या वेब् ासाईटवरून काढण्यात आले आहेत.
देवगड हापूसच्या नावाखाली आंबे सर्रास बाजारात विकले जातात. देवगड समजून खाल्लेल्या अशा सुमार आंब्यांमुळे देवगड हापूसच्या नावाला धक्का पोहोचतो. आणि असा ग्राहक मागे पुढे देवगड नको रे बाबाचा सूर लावतो. त्यामुळे अस्सल देवगड पिकवणाऱ्या देवगडच्या शेतकऱ्यांना मात्र बाजारात आर्थिक नुकसान आणि देवगड ब्रँडचा ऱ्हास सोसावा लागत होता. आणि याला कोणतेच कायदेशीर संरक्षण नव्हते. परंतु आता जीआय मानांकन मिळाल्यास देवगडच्या नावाखाली हापूस विकण्याचा अधिकार फक्त देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल. तसेच इतर भागातील निकृष्ट दर्जाचा हापूससारखा दिसणारा आंबा देवगड म्हणून विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार देखील देवगडच्या शेतकऱ्यांना मिळतील.
देवगडच्या हापूसचे बाजारात प्रस्थापित नाव असल्यामुळे तसेच देवगड हापूसचावास, रंग, चव, सालीची जाडी असे सर्व गुणधर्म इतर हापूससारख्या दिसणाऱ्या फळांपेक्षा सरस आणि सर्वोत्कृष्ट असल्यामुळे देवगड हापूसला स्वतंत्र जीआय मानांकन मिळू शकते ही बाब पुढे आली. तज्ज्ञांनी ही बाब देखील लक्षात आणून दिली की जीआय मानांकन मिळवण्याचा अधिकार फक्त उत्पादकांच्या संस्थेला किंवा उत्पादकांचे हित जपण्याचा अधिकार असणाऱ्या संस्थेला मिळू शकते. आणि विद्यापीठ ही ना उत्पादक संस्था आहे ना तिला उत्पादकांचे हित जपण्याचा अधिकार आहे, म्हणून कोकण कृषी विद्यापीठाला कोणताच जीआय अर्ज करण्याचा अधिकार नाही. म्हणून २०१२ साली संस्थेने देवगड हापूसला जीआय मानांकन मिळावे म्हणून स्वतंत्र अर्ज केला.
त्यानंतर सर्व ठिकाणचा हापूस हा एकच आहे, आणि देवगड काही वेगळा नाही असा विचित्र पवित्रा घेऊन आणि तसा भ्रामक युक्तिवाद करून कोकण कृषी विद्यापीठाने गेली चार वर्षे देवगडच्या जीआय मानांकनाच्या अर्जात अडथळा निर्माण करून ठेवला आहे. जीआय कार्यालय चेन्नईमध्ये असल्याने आणि कोकण विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील दाक्षिणात्य आंबा उत्पादकांबरोबर हातमिळवणी केली असल्यामुळे देवगड हापूसच्या जीआयच्या विषयामध्ये असाच अडथळा राहणार, असे दिसते. (प्रतिनिधी)