६३० प्राथमिक शाळा गिरवणार ‘डिजिटल’ धडे
By admin | Published: March 14, 2016 09:22 PM2016-03-14T21:22:51+5:302016-03-15T00:49:44+5:30
पुढचे पाऊल : शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर विशेष भरे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून अध्यापनाचे धडे देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ६३० प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठा आधार लाभणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये २७८६ प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या सुमारे १२०० आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थीसंख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
संगणक युग असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा वापर शालेय जीवनापासून व्हावा, त्यादृष्टीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दूरदृष्टी समोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनाही डिजिटल स्कूल बनवण्याच्या दृष्टीने केलेल्या सुरु केले होते. त्याला यशही आले असल्याचे समोर येत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात असून, त्यामध्ये डिजिटल शाळा ही संकल्पना उत्तमरित्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रशाळांमध्ये डिजिटल स्कूल ही संकल्पना राबविण्यात येण्याचा निर्णय घेतला होता. त्याची सुरुवात चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तळवडे क्रमांक १मधून करण्यात आली होती. तेथील सर्व स्थानिक ग्रामस्थांनी मिळून लोकवर्गणीतून २ लाख रुपये गोळा करुन ही शाळा डिजिटल स्कूल केली होती.
त्यानंतर शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा डिजिटल होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले. त्यानुसार आज मागील ८ महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या ६३० प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. या डिजिटल शाळांमुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे घेत आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या टिकून राहण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. (शहर वार्ताहर)