हक्काबरोबर कर्तव्य पार पाडा : राधाकृष्णन
By admin | Published: December 10, 2014 09:24 PM2014-12-10T21:24:23+5:302014-12-11T00:00:55+5:30
जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते
रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाच्या मानवी हक्कांची जपणूक केली आहे. एक नागरिक म्हणून मानवी हक्काचा विचार करताना त्याअनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचादेखील सर्वांनी विचार करायला हवा. हक्क मिळवतानाच त्याबरोबर येणारी कर्तव्ये योग्य रितीने पार पाडून इतरांचे हक्कही सुरक्षित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज येथे केले.
जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, उपजिल्हाधिकारी नीता शिंंदे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिनी रजपूत, विधी अधिकारी पी. एन. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या प्रगतशील समाजात मानवी हक्कांबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. मानव म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला प्राप्त झाला आहे. या हक्काच्या बरोबरीने जबाबदाऱ्यादेखील वाढल्या आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वैयक्तिक पातळीवर हक्काचा वापर करताना इतरांचे हक्क जपणूकीसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. या प्रक्रियेतूनच संपूर्ण समाजाच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल, असे विचार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भावी पिढीला दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य आणि जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)