दिगवळे-रांजणवाडी धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:20 AM2021-01-04T11:20:42+5:302021-01-04T11:22:11+5:30
Dam Vinayak Raut sindhudurg - दिगवळे-रांजणवाडी येथे धरण प्रकल्प व्हावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. या धरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक तो निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे सर्वेक्षणही तातडीने करण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी लघुपाटबंधारे प्रकल्प झाल्यास सिंचनाचे क्षेत्र वाढण्याबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. दिगवळे-रांजणवाडी येथे धरण प्रकल्प व्हावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. या धरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक तो निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे सर्वेक्षणही तातडीने करण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
खासदार राऊत यांनी कणकवली तालुक्यातील दिगवळे, नाटळ, दारिस्ते, शिवडाव, गांधीनगर या गावांचा दौरा केला. शिवडाव येथील गडनदीवरील बंधार्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर दारिस्ते ग्रामपंचायतीला भेट देत कुडाळ तालुक्यातील घोडगे-कडावल मार्गाला जोडणार्या रस्त्याची पाहणी केली.
त्यानंतर दिगवळे-रांजणवाडीला भेट देत हळदीचा माळ येथे ग्रामस्थांकडून मागणी होत असलेल्या धरण प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवा सेना तालुका समन्वयक गुरूनाथ पेडणेकर, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, हेमंत सावंत, शामसुंदर परब आदी उपस्थित होते.
यावेळी शामसुंदर जाधव, माजी सरपंच दीपक मेस्त्री, भाई वाळवे, पांडुरंग माने, शशिकांत रेवडेकर, मनोहर माने आदी उपस्थित होते. रांजणवाडी या दुर्गम भागातील विविध समस्यांची माहिती मधुकर जाधव यांनी राऊत यांना दिली. येत्या काही दिवसांत धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामस्थांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगण्यात आले.
सर्वेक्षणासाठी आवश्यक निधी शासनाकडून देणार
दिगवळे-रांजणवाडी येथे चंद्रकांत कोठावळे यांच्या घरी झालेल्या बैठकीत लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देव शेट्टी यांच्याशी धरण प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूविषयी चर्चा केली. तांत्रिकदृष्ट्या प्रकल्पासाठी जागा योग्य असल्याचे देव शेट्टी यांनी सांगितल्यानंतर प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक निधी शासनाकडून दिला जाईल, असे खासदार राऊत यांनी सांगितले.