Sindhudurg: ११ लाखांचा निधी खर्च केला, पावसाच्या सुरुवातीलाच कासार्डे येथील रस्ता खड्ड्यात गेला 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 24, 2024 07:22 PM2024-06-24T19:22:58+5:302024-06-24T19:23:58+5:30

रस्ता झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पहिल्याच पावसात रस्ताची दुर्दशा

Dilapidated condition of the road in Kasarde which was renovated at a cost of 11 lakhs | Sindhudurg: ११ लाखांचा निधी खर्च केला, पावसाच्या सुरुवातीलाच कासार्डे येथील रस्ता खड्ड्यात गेला 

Sindhudurg: ११ लाखांचा निधी खर्च केला, पावसाच्या सुरुवातीलाच कासार्डे येथील रस्ता खड्ड्यात गेला 

निकेत पावसकर

तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी बॉक्सवेल ब्रीज ते तळेरे पियाळीमार्गे फोंडा रस्त्याला जोडणारा आंबा स्टॉपपर्यंतच्या रस्त्यावर भले मोठ्ठे खड्डे पडले आहेत. एप्रिल, मेमध्येच या रस्त्यावर सुमारे ११ लाखांचा निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आले होते. पावसाच्या सुरुवातीलाच लाखांचा निधी खड्ड्यात गेला आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत व पावसाळ्यानंतर पुन्हा रस्ता मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालकांकडून होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी बॉक्सवेल ब्रीज ते तळेरे पियाळीमार्गे फोंडा या रस्त्याचा काही भाग एप्रिल-मेमध्ये नूतनीकरण करण्यात आले आणि पावसाच्या सुरुवातीलाच मान्सून सक्रिय होण्यापूर्वी या रस्त्याची अक्षरक्ष: दुरवस्था होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. यावरून पादचारी व वाहने यांना मार्ग काढत जावे लागत आहे. मुळात संबंधित विभागाचे या मार्गावर गेली काही वर्षे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असताना यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून ११ लाखांचा निधी खर्च करून रस्ता करण्यात आला होता.

मुंबई-गोवा महामार्गावरून तळेरे पियाळी, गडमठ मार्गे फोंड्याकडे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून कासार्डे ब्राह्मणवाडी बॉक्सवेल पुलाखालून आंबा स्टॉप असा रस्ता यावर्षी केला आहे. सध्या या रस्त्याची अवस्था पाहता मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेले नाही. परिणामी गुडघाभर खड्डे पडून त्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्याची रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

लाखो रुपयांचा निधी खड्ड्यात

या रस्त्याचे नूतनीकरण एप्रिल-मेमध्ये म्हणजेच एक ते दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. यासाठी सुमारे ११ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, हा सगळा निधी अक्षरश: खड्ड्यात गेल्याची चर्चा केली जात आहे. त्यात तळगाव ते कलमठ टप्यात काम करणाऱ्या महामार्ग ठेकेदार कंपनीचे कार्यालय, सिमेंट, खडी प्लांट वाहनस्थळ यापूर्वीच या ठिकाणी होते, त्यामुळे अनेक वाहने याच मार्गावर ये-जा करत होती. तसेच कासार्डे मायनिंग क्षेत्रातील अतिजड वाहने याच मार्गावरून मुंबई गोवा महामार्गावर येत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली होती.

नागरिकांची नाराजी

गेली अनेक वर्षे हा रस्ता खड्डेमय असून, यावर्षी रस्ता झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पहिल्याच पावसात या रस्ताची दुर्दशा झाल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी नाराजी व्यक्त करीत आहेत. तरी तातडीने या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे व पावसानंतर पुन्हा संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Dilapidated condition of the road in Kasarde which was renovated at a cost of 11 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.