दिलीप नार्वेकरांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: November 14, 2016 09:46 PM2016-11-14T21:46:00+5:302016-11-14T21:46:00+5:30
सावंतवाडी न. प. प्रभाग तीन : दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ३ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या बालेकिल्ल्यात दीपक केसरकरांच्या ‘एंट्री’ने मागच्या निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्का दिला होता. मात्र, यावेळी काँग्रेसची या प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली असून, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांचा मुलगा राघवेंद्र नार्वेकर या प्रभागातून निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे या प्रभागावर सावंतवाडीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागातून दोन जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग ३ मध्ये वैश्यवाडा, भटवाडीचा काही भाग, चितारआळी, पांजरवाडा असा भाग येतो. या प्रभागातून भाजपकडून तृप्ती शंकरदास व आनंद नेवगी, शिवसेनेतून शुभांगी सुकी व सुरेश भोगटे, तर काँग्रेसकडून शर्वरी मडगावकर व राघवेंद्र नार्वेकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजू पनवेलकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली असून, सध्या तरी कोणाला मतदार कौल देतील, हे सांगता येणार नाही.
कारण शिवसेनेने विद्यमान नगरसेविका शुभांगी सुकी यांच्यासह माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना या प्रभागातून उमेदवारी दिली आहे. वैश्यवाडा येथे सुकी यांचा चांगला प्रभाव आहे, तर चितारआळी भागात सुरेश भोगटे यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातच पाच वर्षांपूर्वी शुभांगी सुकी या मोठ्या मताधिक्क्याने या प्रभागातून निवडून आल्या होत्या. प्रभागात प्रत्येक घरापर्यंत त्यांचा संपर्क आहे. त्याचा फायदा त्यांना होणार आहे.
भाजपने आनंद नेवगी यांना उमेदवारी देऊन सेना व काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. नेवगी यांनी या प्रभागात चांगले काम केले आहे. त्याशिवाय त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यांच्या जोडीला चितारआळीतून तृप्ती शंकरदास यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना व भाजपचे उमेदवार या प्रभागातून जोरदार मेहनत घेत असून, काँग्रेसची मात्र या प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभाग ३ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. चितारआळीमध्ये बरीच वर्षे अॅड. दिलीप नार्वेकर यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्यांनी अनेक वर्षे नगरसेवक व नगराध्यक्षपद भूषविले आहे. मागील निवडणुकीत त्यांचा काही मतांनी पराभव झाला होता. यावेळी ते स्वत: निवडणूक रिंगणात नसले तरी त्यांचा मुलगा निवडणूक लढवित आहे. मात्र, मुलासाठी अॅड. दिलीप नार्वेकर यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली आहे. संपूर्ण सावंतवाडीचे लक्ष या प्रभागावर लागून राहिले आहे.
काँग्रेसला या प्रभागात खरा अडसर आहे तो अपक्ष उमेदवार राजू पनवलेकर यांचा. त्यांनी या प्रभागात गेल्या पाच वर्षांपासून काम केले आहे. मात्र, आयत्यावेळी त्यांना डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच पनवेलकर यांचे याच प्रभागात वास्तव्य असल्याने त्याचाही फटका काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसला या प्रभागाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. (प्रतिनिधी)