सिंधुदुर्गातील वाळूचा लिलाव आठ दिवसात पूर्ण करणार : दिलीप पांढरपट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:23 PM2019-01-21T16:23:12+5:302019-01-21T16:24:42+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करावी लागली. ती कारवाई यापुढेही चालूच राहील. मात्र , शासनाने वाळूच्या लिलावाला परवानगी दिल्याने येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व वाळूचे लिलाव जाहीर केले जातील . अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करावी लागली. ती कारवाई यापुढेही चालूच राहील. मात्र , शासनाने वाळूच्या लिलावाला परवानगी दिल्याने येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व वाळूचे लिलाव जाहीर केले जातील . अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिली.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या चित्ररथ प्रचारासाठी ते कणकवली येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यानी उत्तर दिले. ते म्हणाले, महसुल विभागाच्यावतीने बेकायदेशीर वाळू रोखण्यासाठी गेले काही महिने आम्ही कारवाई केली. बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता तेथे होड्या नष्ट केल्या.
बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल पातळीवर आणि मंडळ अधिकाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले. मात्र बेकायदेशीर वाळू सुरू राहिली. लवकरच जिल्ह्यातील वाळूचे लिलाव जाहीर होणार असून आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
यासाठी पहिल्या टप्प्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर वाळू लिलाव होतील. तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
वाळू लिलाव रखडल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत असे विचारले असता जिल्हाधिकारी म्हणाले, वाळूचे दर निश्चितच वाढले आहेत. बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यापेक्षा वाळूचा लिलाव लवकर होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे लिलाव रखडले. आता तशी अडचण येणार नाही आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वाळू उपशावर नियंत्रण येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.