Shivaji Maharaj Statue Collapse: दोषींना थेट फाशी द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ठाम भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:08 PM2024-09-02T12:08:18+5:302024-09-02T12:11:20+5:30
राजकोट येथील पुतळा दुर्घटनेची पाहणी
मालवण : आज जगभरात समुद्रकिनारी अनेक मोठमोठे पुतळे साकारण्यात आले आहेत. आजपर्यंत कधीही किनारपट्टीवरील पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली नाही. मालवण राजकोट किल्ल्यातील शिवपुतळा बनविणाऱ्यांकडून मोठी चूक झाल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. यामुळे अशा चुकीला माफी नसून यातील दोषींना थेट फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे मांडली.
मंत्री आठवले यांनी रविवारी दुपारी राजकोट किल्ला येथे भेट देत दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, राजकोट किल्ला येथे शिवस्मारक व्हावे. एक भव्य पुतळा उभारून किल्ल्याला पुनरुज्जीवित करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करावे ही राज्य शासनाची भावना चांगली होती. त्याप्रमाणे त्यांनी आवश्यक ते सहकार्य केले आहे. मात्र, पुतळ्याची निर्मिती चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने ही दुर्घटना घडली. कोणत्याही प्रकारचे चक्रीवादळ न होता पुतळा कोसळला असल्याने त्याला राज्य शासनाला दोषी ठरविणे योग्य नाही. आता पुन्हा नव्याने पुतळा उभा करणे आणि शिवप्रेमींना पुन्हा आदराचे स्थान निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे.
शिवपुतळा दुर्घटना ही दुर्दैवीच घटना आहे. या घटनेवर राजकारण होऊ नये. या घटनेनंतर सर्वांनी एकत्रित होऊन घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यातील दोषींचा शोध घेऊन त्यांना कडक शासन होण्यासाठी शासन यंत्रणांना सहकार्य करायला हवे. विरोधकांकडून फक्त टीका आणि राजकारण हीच भूमिका घेण्यात येत आहे. यातील प्रमुख आरोपीला फाशीची शिक्षा आणि इतर दोषींना कडक शासन व्हायला हवे.
समिती स्थापनेची सूचना
विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रित येत नवीन शिवपुतळा उभारण्यासाठी एक समिती स्थापन करून त्यानुसार कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील चर्चा महत्त्वाची असते. याही ठिकाणी आवश्यकता भासल्यास आपण विरोधकांशी चर्चा करू आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अशाप्रकारची समिती स्थापन करण्याच्या सूचना करू, असेही आठवले यांनी सांगितले.