किल्ले सिंधुदुर्ग मार्गावर आठ महिन्यांनंतर दिशादर्शक बोया कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:21 IST2019-02-08T15:18:40+5:302019-02-08T15:21:28+5:30
मालवण : मालवण बंदरातील खडकाळ भाग लक्षात घेता नौकानयन मार्ग सुलभ होण्यासाठी बंदर विभागाकडून दिशादर्शक समुद्री बोया बसवण्याची कार्यवाही ...

मालवण बंदर मार्गावर किल्ले सिंधुदुर्ग समोरील खडकाळ मार्गावर दिशादर्शक बोया बसविण्यात आले.
मालवण : मालवण बंदरातील खडकाळ भाग लक्षात घेता नौकानयन मार्ग सुलभ होण्यासाठी बंदर विभागाकडून दिशादर्शक समुद्री बोया बसवण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाचे लक्ष वेधताच आठ महिने रखडलेले दिशादर्शक बोया बसविण्यात आले.
समुद्रात टाकण्यात येणारी दिशादर्शक लोखंडी बोया बसवण्याची निविदा प्रक्रिया होऊन आठ महिन्याच्या कालावधी उलटला मात्र समुद्रात पिंपे बसवण्याची कार्यवाही झाली नाही. बंदर विभागाकडून याची कार्यवाही न झाल्याने रात्रीच्यावेळी बंदरात परतणाऱ्या मासेमारी नौका खडकांना आपटून अपघात स्थिती निर्माण झाली आहे.
ही बाब मागील महिन्यात मच्छीमारांनी तसेच तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख बाबी जोगी यांनी आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी तात्काळ दिशादर्शक बोया बसवण्याची कार्यवाही करा, अशा सूचना बंदर अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
मालवण बंदराच्या मार्गावर पाच दिशादर्शक बोया बसवण्यात आली आहेत. कायमस्वरूपी हे बोया समुद्रात राहणार असून यावर मार्गदर्शक दिवेही बसवण्यात आले आहेत, अशी माहिती मालवण बंदर विभागाच्या वतीने देण्यात आली. किल्ले सिंधुदुर्ग समोरील खडकाळ समुद्री मार्गावर पाच ठिकाणी दिशादर्शक बसवले आहेत.
नौकानयन मार्ग सुलभ
पूर्वी बसवण्यात आलेले लोखंडी बोया पावसात वाहून गेली. त्यानंतर दिशादर्शक बोया बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र अर्धा मासेमारी हंगाम संपला तरी दिशादर्शक न बसल्याने मच्छीमारातून नाराजी व्यक्त होत होती. मच्छीमारांची सततची मागणी व आमदारांच्या सुचनेनंतर रखडलेली प्रक्रिया गतिमान होत दिशादर्शक बसवण्यात आली आहेत. भरती ओहोटीच्या वेळी तसेच रात्रीच्या वेळी बंदरात परतणाऱ्या व सकाळी लवकर मासेमारीस निघणा?्या बोटींचा मार्ग सुलभ होणार आहे. याबाबत मच्छीमारातून समाधान व्यक्त करण्यात आले.