सैनिक अकॅडमीच्या संचालकास अटक, देवगड समुद्रात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:57 AM2023-12-11T11:57:03+5:302023-12-11T11:57:20+5:30
देवगड (जि. सिंधुदुर्ग ) : देवगड समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे व हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निगडी (पुणे) येथील ...
देवगड (जि. सिंधुदुर्ग) : देवगड समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे व हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निगडी (पुणे) येथील खाजगी सैनिक अकॅडमीचे संचालक नितीन गंगाधर माने याला रविवारी देवगड पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी. घाडगे यांनी रक्कम १५,०००रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करत मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी देवगड समुद्रकिनाऱ्यावर अंकिता गालटे, प्रेरणा डोंगरे, अनिशा पडवळ व पायल बनसोडे या चार मुलींचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. या मुलींची जबाबदारी त्यांना सहलीसाठी घेऊन आलेल्या निगडी (पुणे) येथील खाजगी सैनिक क्लासचे संचालक नितीन गंगाधर माने यांच्यावर होती. मात्र, संबंधित संचालकांनी समुद्राच्या ठिकाणी नेले असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात खेळत असताना कोणतेही लाइफ जॅकेट वा अन्य सुविधा पुरविलेल्या नाहीत.
तसेच, किनाऱ्याच्या खोलीची कोणतीही माहिती, भरती ओहोटीची माहिती, स्थानिक जीवरक्षकांचा कोणताही सल्ला न घेता मुलांच्या काळजीसाठी कोणताही माहीतगार सोबत ठेवलेला नव्हता. तसेच, प्रशिक्षणार्थींना वाहनातून नेण्याकरिता जे वाहन वापरले त्याची चालक-मालकाकडून वाहतूक करावयाची कोणतीही परवानी प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेतलेली नव्हती. विनापरवाना बस क्रमांक (एमएच१४ जीयूयू ९३८३)मधून त्यांचा चालक व मालक यांच्यासोबत संगनमत केले होते. अशा आशयाची तक्रार प्रेरणा राहुल गलाटे हिचे वडील राहुल पांडुरंग गलाटे (रा. उस्मानाबाद) यांनी देवगड पोलिसांत दाखल केली होती.
या तक्रारीनुसार आरोपी नितीन गंगाधर माने याने निष्काळजीपणे व बेपर्वाईने विद्यार्थिनींची योग्य काळजी न घेता सहल आयोजित केल्याप्रकरणी देवगड पोलीसांनी आरोपी नितीन गंगाधर माने यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याकामी न्यायालयाने आरोपीला जामिनावर मुक्त केले आहे. संचालकासोबत सहलीसाठी वापरण्यात आलेली विनापरवाना बसचा मालक सखाराम बापू तांबे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.