Sindhudurg: लाखोचा गंडा घालणाऱ्या संकल्प फायनान्सच्या संचालकांना मारहाण, सावंतवाडीतील घटना
By अनंत खं.जाधव | Published: February 29, 2024 04:12 PM2024-02-29T16:12:06+5:302024-02-29T16:12:24+5:30
ग्राहक संतप्त: पोलिसांकडून हस्तक्षेप : संचालक पोलिसांच्या ताब्यात
सावंतवाडी : कमी व्याजदराने पैसे देतो असे सांगून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संकल्प फायनान्सच्या संचालकांना गुरूवारी संतप्त झालेल्या ग्राहकांनी मारहाण केली.
त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी संतप्त ग्राहकांनी पोलिसांची गाडी रोखून धरली. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गाडी जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तर याबाबत पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हे दाखल करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर आंदोलक थोडे शांत झाले मात्र उशिरापर्यंत रास्ता रोको सुरू होता.
सावंतवाडी-सालईवाडा भागात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या संकल्प फायनान्स कंपनीकडून कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालण्यात आला होता. त्यानंतर कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी आपण ते पैसे परत करतो, असे सांगितले होते. त्यानुसार पैसे परत मिळण्यासाठी आज ग्राहक जमले होते.
मात्र पैसे देण्यास कंपनीचे अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली ठरल्या प्रमाणे पैसे न देण्यात आल्याने संतप्त ग्राहकांचा पारा चढला. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच शहरात धिड काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याचवेळी त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला व त्या दोघांना ताब्यात घेत ग्राहकांना शांत केले.
परंतु त्यांना गाडीत बसल्यानंतर तक्रार नाही मग तुम्ही त्यांना ताब्यात का घेता, असा जाब विचारत आमचे पैसे परत देणार कोण? असा सवाल करत संतप्त ग्राहकांनी पोलिसांच्या गाडी समोर ठिय्या मांडला.हा प्रकार बराच उशिर सुरू होता.नागरिकांनी ही मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.जो पर्यत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नाही असा पवित्रा ग्राहकांकडून घेण्यात आला अखेर पोलिसांनी ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असे स्पष्ट केले. त्यानंतर तेथून पोलिस जाण्यास निघाले पण काहि ग्राहकांचे समाधान होत नसल्याने उशिरापर्यंत ते तेथेच ठिय्या मांडला होता.
दरम्यान या संकल्प फायनान्स च्या वतीने कार्यालय थाटल्या नंतर अनेक राजकीय पक्षांकडून आक्षेप घेण्यात आले होते.तसेच कंपनी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.पण या तक्रारीची दखल पोलिसांकडून घेण्यात आली नव्हती.
त्या काळात अनेक ग्राहकांनी पैसे भरले होते.त्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून यातील काहि संचालक कर्मचाऱ्यांवर ऑफिसची जबाबदारी देऊन गायब झाले होते. ते आज सावंतवाडीत दखल झाल्यानंतर ग्राहकांकडून त्यांना चांगलाच धडा शिकवला.