मळेवाड सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:56 AM2019-11-13T10:56:06+5:302019-11-13T10:57:19+5:30
मळेवाड-कोंडुरे सरपंच सचला केरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर करण्यात आल्याने गेले काही दिवस चाललेल्या सरपंचांविरुद्धच्या अविश्वास ठराव घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. अकरा सदस्यांची संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी अविश्वास ठरावासाठी नऊ सदस्यांची गरज होती. मात्र, दोन सदस्य यावेळी अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची संख्या फक्त आठ असल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.
आरोंदा : मळेवाड-कोंडुरे सरपंच सचला केरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर करण्यात आल्याने गेले काही दिवस चाललेल्या सरपंचांविरुद्धच्या अविश्वास ठराव घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. अकरा सदस्यांची संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी अविश्वास ठरावासाठी नऊ सदस्यांची गरज होती. मात्र, दोन सदस्य यावेळी अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची संख्या फक्त आठ असल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.
केरकर यांच्यावरील अविश्वास ठरावासंदर्भातील बैठकीचे आयोजन सोमवारी दुपारी ३ वाजता करण्यात आले होते. या बैठकीला सरपंचांसह एकूण नऊ सदस्य उपस्थित होते. एकूण अकरा सदस्यांपैकी पूजा मसुरकर व वैष्णवी परब हे सदस्य उपस्थित नसल्याने अविश्वास ठराव नाट्याला वेगळेच वळण मिळाले.
सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बैठकीला सुरुवात करून बैठकीबाबत सदस्यांना कल्पना व समज दिली. अविश्वास ठरावासाठी सरपंचांविरोधात आठ सदस्यांनी हात वर केले. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश सदस्यांनी आवश्यकता असल्याने अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी नऊ सदस्यांची गरज होती. मात्र, दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. तहसीलदारांनी अविश्वास ठराव फेटाळल्याचे सांगितले.
सरपंचांनी विरोधातील सदस्यांनी अविश्वास ठरावास दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने घोडाबाजार झाल्याची प्रतिक्रिया सभागृहातून बाहेर पडल्यावर व्यक्त केली. हा अविश्वास ठराव बारगळल्यानंतर पाच सदस्यांनी आपले राजीनामे सादर केले. यात उपसरपंच दिलीप मुळीक, सदस्य स्वाती सातार्डेकर, नंदू नाईक, दीपिका मुळीक, भगवान मुळीक यांचा समावेश आहे.