पाच नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई
By admin | Published: October 9, 2015 01:15 AM2015-10-09T01:15:30+5:302015-10-09T01:28:51+5:30
सतीश सावंत : कणकवलीत राजकीय घडामोडींना वेग, जिल्हावासीयांमध्ये उत्सुकता
कणकवली : कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराला मतदान न करण्याचा अॅड. प्रज्ञा खोत यांनी घेतलेला निर्णय हा संदेश पारकर यांच्या व्यक्तीनिष्ठेपोटीच आहे. त्यांच्यासह पक्षातर्फे व्हीप बजावलेला असतानाही बंडखोरी करणाऱ्या पाच नगरसेवकांवर येत्या चार दिवसांत शिस्तभंगाची कारवाई करण्याबरोबरच त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर तसेच समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्राधीकृत केल्याप्रमाणे काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना पक्षांतर्गत व्हीप बजावण्यात आला होता. मात्र, त्याचे उल्लंघन करून पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल अॅड. प्रज्ञा खोत, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, माधुरी गायकवाड व सुमेधा अंधारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. अॅड. खोत यांनी मतदानाच्यावेळी पारकरांवरील व्यक्तीनिष्ठा सिद्ध केली आहे. त्यांना पक्षाने अडीच वर्षे मानसन्मान देऊनही काँग्रेस नेत्यांचा त्यांनी अपमान केला आहे. खोत यांची ही संस्कृतीच आहे. नगरपंचायतीत काँग्रेसच्या चिन्हावर १३ उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी पाच जणांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून निवडून यावे. नारायण राणे यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. पण इतर पक्षात ज्यांना जायचे होते त्यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी एका अर्थाने काँग्रेसला ‘डॅमेज’ केले आहे. त्यांच्या या कृतीमुळे इतर पक्षही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. एका नगरसेवकाच्या गद्दारीमुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. पक्षाने व्हीप बजावलेला असतानाही पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यामुळे त्यांना मिळालेले नगराध्यक्ष पद हे औट घटकेचे ठरणार आहे. त्या पाच नगरसेवकांना सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही असे प्रयत्न पक्षाच्यावतीने करण्यात येतील.
नारायण राणे यांच्याकडे जाण्यापासून अॅड. खोत यांना कोणीच कधी आडकाठी केलेली नाही. त्यामुळे स्वकीयांनीच त्यांना त्रास दिला हे खरे नाही. याउलट त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची मोकळीकच देण्यात आली होती. मात्र, शब्द देऊन विश्वासघात करण्याची त्यांना सवयच आहे. ३ आॅक्टोबर रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. गटातटाचे राजकारण राणे यांनी कधीच केले नाही. सव्वा वर्षाचे नगराध्यक्षपद हा प्रस्ताव खोत यांनीच राणेंकडे आणला होता, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस कार्यालयात बैठक
नगराध्यक्षपद निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी फक्त आठ नगरसेवक उपस्थित होते. मावळत्या नगराध्यक्षा प्रज्ञा खोत अनुपस्थित राहिल्या. या बैठकीनंतर सतीश सावंत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, सभापती गुरुनाथ पेडणेकर तसेच अन्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपंचायत कार्यालय परिसरात दाखल
झाले होते. (वार्ताहर)
प्रज्ञा खोत यांची पत्रकार परिषद : राणेंनी पारकरांना दिलेली कमिटमेंट पूर्ण केली
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासारखा कुशल प्रशासक तसेच संदेश पारकरांसारखा धडाडीचा कार्यकर्ता या दोघांची कणकवली शहराला आवश्यकता आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी पारकरांना दिलेली ‘कमिटमेंट’ माधुरी गायकवाड यांना मतदान करून एका अर्थाने मी पूर्ण केली, असे अॅड. प्रज्ञा खोत यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष दालनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी नूतन नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैय्या पारकर, राजश्री धुमाळे, सुमेधा अंधारी, रुपेश नार्वेकर आदी उपस्थित होते. अॅड. खोत म्हणाल्या, नगराध्यक्ष निवडणूक ही पारकर तसेच नलावडे गटातच झाली. आमचे नेतृत्व नारायण राणे यांच्या नावाचा वापर करून अनेकांनी स्वत:चा फायदा करून घेतला. हे खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले.
प्रज्ञा खोत यांच्याकडून राणेंच्या
प्रति कृतज्ञता
आपापसातील वाद चव्हाट्यावर आणून राजकारणही करण्यात आले. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नकळतपणे नारायण राणे यांच्यापासून अलिप्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, शहरवासियांच्यावतीने नारायण राणे यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. माझ्यासाठी ते पितृतुल्य व्यक्तिमत्व आहेत. गेल्या सहा दिवसांच्या घडामोडीनंतर या निवडणुकीत माझे मत निर्णायक होते. पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा तसेच शहर निष्ठा यांचा विचार मी केला. शहर निष्ठेसाठी संदेश पारकर यांना साथ देणे महत्वाचे होते. शहरासाठी काम करताना विकास हेच माझे ध्येय होते. त्यादृष्टीनेच मत देताना मी विचार केला. निवडणुकीनंतर नारायण राणे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण त्यांची भेट घेऊ, असे आश्वासन इतर सर्व नगरसेवकांनी मला दिले आहे, असेही अॅड. खोत यांनी यावेळी सांगितले.