सिंधुदुर्गात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘फ्रायनोडर्मा कोंकणी ‘ असे केले नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 08:56 AM2024-11-26T08:56:45+5:302024-11-26T08:57:08+5:30

बेडकाची ही प्रजात २०२१ साली ठाकूरवाडी गावात असणाऱ्या तलावात डॉ. योगेश कोळी यांना दिसून आली

Discovery of a new species of frog in Sindhudurga; Named as Phrynoderma Konkani | सिंधुदुर्गात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘फ्रायनोडर्मा कोंकणी ‘ असे केले नामकरण

सिंधुदुर्गात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘फ्रायनोडर्मा कोंकणी ‘ असे केले नामकरण

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बेडकांच्या नव्या प्रजातींंचा शोध लावण्यात आला आहे. कोकणच्या भूमिवरुन या प्रजातीचे नामकरण ‘फ्रायनोडर्मा कोंकणी’ असे करण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील पाणथळ आणि कातळ सड्यांवर या बेडकाचा अधिवास आहे. या शोधामुळे सिंधुदुर्गातील पाणथळ जागा आणि कातळ सड्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे प्राध्यापक व संशोधक डॉ. योगेश कोळी यांनी दिली.

कुडाळमधून शोधलेल्या बेडकाच्या या नव्या प्रजातीच्या शोधाबाबत डॉ. योगेश कोळी यांनी सांगितले की, या नव्या प्रजातींच्या संशोधनामध्ये शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील संशोधक डॉ. ओमकार यादव, डॉ. योगेश कोळी, दहिवडी कॉलेजचे संशोधक डॉ. अमृत भोसले, युनिव्हर्सिटी कॉलेज त्रिवंदरम संशोधन केंद्र येथील डॉ. सुजित गोपालन, माय वे जर्नी ऑर्गनायझेशन संस्थेचे गुरुनाथ कदम, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे अक्षय खांडेकर आणि झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉ. के.पी दिनेश या संशोधकांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणथळ जागांचे सर्वेक्षण चालू असताना ही प्रजाती शोधण्यात आली. बेडकाची ही प्रजात २०२१ साली ठाकूरवाडी गावात असणाऱ्या तलावात डॉ. योगेश कोळी यांना दिसून आली. या नवीन प्रजातीच्या  आकार, डोक्याची रुंदी, पोटाकडील बाजूला असलेले त्वचीय प्रक्षेपण आणि पाठीवरील विशिष्ट रचनेमुळे ही प्रजाती वेगळी आहे हे सिद्ध करण्यात आले. या शोधामुळे भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आढळणाऱ्या फ्रायनोडर्मा या बेडकाच्या वंशामध्ये भर पडून फ्रायनोडर्मा कोंकणी या नवीन प्रजातीसह या वंशात आता एकूण पाच प्रजातीचा समावेश झाला आहे. 

Web Title: Discovery of a new species of frog in Sindhudurga; Named as Phrynoderma Konkani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.