चर्चा फिस्कटली; रेशन दुकानांचा बंद कायम
By admin | Published: May 14, 2015 10:03 PM2015-05-14T22:03:14+5:302015-05-15T00:03:00+5:30
आंदोलन सुरुच : जिल्हाधिकारी यांच्यासमवेतच्या बैठकीत तोडगा काढण्यात अपयश
रत्नागिरी : जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदार तसेच केरोसीन विक्रेत्यांनी १ मेपासून रेशनदुकाने बंद ठेवल्याने सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा प्रश्न राज्याचा असल्याने त्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू. पण, जनतेचा विचार करून बंदचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. मात्र, निर्णय होईपर्यंत आपल्या ‘बंद’च्या निर्णयावर ठाम असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
गेल्या दहा वर्षांत रास्तदर धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या कमिशनमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढूनही वाहतुकीचे कमिशन सुमारे दहा वर्षांपूर्वीचे होते, तेवढेच ठेवण्यात आले आहे. शासनाने धान्य दुकानापर्यंत वाहतूक करण्याचे आश्वासन न पाळल्याने या दुकानदारांना पदरमोड करून वाहतूक खर्च भागावावा लागत आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी ९७२ दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अंत्योदय गटातील ४२,३१२ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य गटातील २,३२,४६३ शिधापत्रिकाधारक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. दुकाने उघडतील, या आशेवर हे ग्राहक दरदिवशी दुकानात येऊन परत जात आहेत.
याबाबत तडजोड करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे - सावंत उपस्थित होत्या.
वाहतुकीचा प्रश्न हा राज्यस्तरावर सोडवला जाणार आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. मात्र, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी करण्यात आले. मात्र, वाहतुकीच्या कमिशनचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपण बंदच्या निर्णयावर कायम असल्याचे या दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, जिल्हा सचिव नितीन कांबळे, उपाध्यक्ष शशिकांत दळवी, प्रशांत पाटील, संतोष गुरव आदी उपस्थित होते.
दुकानदारांच्या या निर्णयामुळे सध्या तरी दुकाने सुरू होणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांना आता केवळ दुकाने उघडण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला घास देणारी ही रेशन दुकाने आता बंद असल्याने ग्रामीण जनतेचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
संघटना निर्णयावर ठाम असल्याने हाल
अंंत्योदय योजनेचे ४२,३१२ शिधापत्रिकाधारक आहेत, तर प्राधान्य गटाचे २,३२,४६३ इतके शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदयसाठी १०६६ मेट्रिक टन तांदूळ, तर ४२६ मेट्रिक टन गव्हाचे नियतन मंजूर आहे. प्राधान्य गटासाठी २,९९६ मेट्रिक टन तांदूळ, तर १९९८ मेट्रिक टन गहू पाठविला जातो. सध्या ४०६२ मेट्रिक टन तांदूळ आणि २४२४ मेट्रिक टन गहू गोदामात पडून आहे.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी रास्तदर धान्य दुकानदारांना बंदचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली असली तरी दुकानदारांची संघटना आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम आहे. शासनाने वाहतुकीच्या कमिशनचा प्रश्न अजूनही रेंगाळत ठेवला आहे. त्यामुळे आता याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार दुकानदारांनी व्यक्त केला आहे.