सिंधुदूर्ग : बंदरजेटी येथील गाळ उपशाचे मुंबईतील बैठकीत आदेश, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:15 PM2018-01-13T13:15:49+5:302018-01-13T14:24:54+5:30
किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या समस्यांसंदर्भात पालकमंत्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी व प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
मालवण : किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या समस्यांसंदर्भात पालकमंत्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी व प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
यात प्रमुख मागण्यांपैकी बंदर जेटीकडील गाळ काढण्याच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला असून त्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने विविध समस्या व मागण्यांसंदर्भात किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या मागण्यांसंदर्भात मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ९ व १० जानेवारीला मुंबईत बैठक झाली.
या बैठकीस पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी, किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत, स्वप्नील आचरेकर, बाळा तारी, राजू पराडकर, संजय नार्वेकर, अंतोन डिसोझा, आशिष जोगी आदी उपस्थित होते.
तसेच सर्व्हे प्रमाणपत्रासाठी मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने व्यावसायिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यासंदर्भात मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना जिल्हा स्तरावर शिबिर घेऊन आॅनलाईन सर्व्हे प्रमाणपत्र देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
होडी वाहतूक संघटनेच्या अन्य मागण्याही टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले, अशी माहितीही मंगेश सावंत यांनी दिली.
दोन दिवसांत गाळ उपसा काम होणार सुरू
बैठकीत किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यात जेटीकडील गाळाचा उपसा करण्याची प्रमुख मागणी होती. ही मागणी तत्काळ मान्य करताना या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. येत्या दोन दिवसांत गाळ उपसा करण्याचे काम सुरू होणार आहे.