बुरूड व्यवसायाला उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 11:31 PM2016-05-11T23:31:47+5:302016-05-11T23:54:19+5:30
प्लास्टिकचा वापर वाढला : समाजातील युवकांचेही दुर्लक्ष; शासनाच्या मदतीची गरज
वैभव साळकर -- दोडामार्ग --प्लास्टिकचा वाढता वापर, बाजारपेठेत मिळणारा अल्प मोबदला आणि युवा पिढीचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे परंपरागत चालत आलेला हस्तकला बुरूडकाम व्यवसाय संकटात सापडला आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात बाजारपेठेत रेडीमेड चटई, टोपल्या व अन्य प्लास्टिक सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे बांबपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे परंपरागत चालत आलेल्या या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. बांबूच्या वाढत्या दरामुळे काही कारागिरांनी बरूड व्यवसाय बंंद केल्याचे सांगितले. सुमारे २४ फूट लांब व १२ फूट रूंद आकाराच्या दाळी, टोपली, इत्यादी साहित्य बनवायचे असेल, तर किमान १५ दिवस मेहनत करावी लागते. याकामी काही वेळा मजुरीवर माणसे घेऊन काम केले जाते.
दाळ्या, टोपल्या, सुप, झाडू व अन्य घरगुती वापरातील वस्तू एक-दोन दिवसांत बनू शकतात. लग्न कार्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूच्या वस्तंूची मागणी असते. तयार केलेला माल गावात किंवा स्थानिक बाजारपेठेत नेला जातो. परंतु पुरेसा मोबदला मिळत नसल्याने बहुतांश बुरूड कारागीर नजीकच्या म्हापसा- गोवा येथील बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेतात. परंतु तेथेही पारंपरिक संस्कृतीवर आधुनिकतेचा प्रहार पडल्याने तेजी-मंदीचा सामना या कारागिरांना कारावा लागत आहे.
विज्ञान व प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील हस्तकला उद्योग ऱ्हास पावत चालले आहेत. नवनवे शोध, उपकरणे व इतर साहित्य स्पर्धात्मक बाजारपेठेत येत आहे. त्यामुळे बुरूडकाम व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. तरीदेखील काही कारगिरांच्या जिद्दी स्वभावामुळे स्पर्धात्मक बाजारपेठेत हा व्यवसाय कसाबसा टिकून आहे.
परंतु, प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही अंशी तरुण पिढीनेही या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आहे.
मात्र, दोन हातांना काम मिळवून देणाऱ्या या बुरूडकाम व्यवसायाकडे तरुणांनी दुर्लक्ष न करता आकर्षित होणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत आपण तयार केलेल्या वस्तूंचा टिकाव लागावा, या व्यवसायास ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी बुरूडकाम प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. असे प्रशिक्षण काही संस्थांमार्फत जिल्ह्यात दिले जात आहे. त्याला चालना देण्यासाठी शासनाच्या मदतीचीही खरी गरज आहे. लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही प्राप्त झाल्यास बेरोजगार तरूणांना बुरूडकाम व्यवसाय रोजगार मिळवून देणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.