शिक्षणमंत्र्यांकडून शंकांचे निरसन, आजरा येथून निघालेली शिक्षणहक्क यात्रा आंबोलीत स्थगित

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 30, 2023 05:30 PM2023-10-30T17:30:52+5:302023-10-30T17:31:40+5:30

शाळा बंद करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे केले स्पष्ट

Dismissal of doubts by the Education Minister, Right to Education Yatra from Ajara suspended in Amboli | शिक्षणमंत्र्यांकडून शंकांचे निरसन, आजरा येथून निघालेली शिक्षणहक्क यात्रा आंबोलीत स्थगित

शिक्षणमंत्र्यांकडून शंकांचे निरसन, आजरा येथून निघालेली शिक्षणहक्क यात्रा आंबोलीत स्थगित

आंबोली (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने कमी पटसंख्या हे कारण सांगून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या आणि राज्य शासनाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या शाळा बंद करून त्या समूह शाळेत समायोजित करण्याच्या निर्णयाविरोधात आजरा येथून ‘शिक्षणहक्क यात्रा’ आंदोलन आयोजित केले होते. रविवारी रात्री आंबोली येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या आंदोलकांची भेट घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांचा घराच्या दिशेने आजरा येथून निघालेला हा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती शाळा बचाव आंदोलक कॉ. संपत देसाई यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विजय दरडेकर, शिवाजी गुरव, बाळेश नाईक, अमर चव्हाण, निवृत्ती कांबळे, संजय घाडगे, प्रकाश मोरोजकर आदी उपस्थित होते.

शासनाच्या त्या निर्णयाविरोधात आजरा येथून ‘शिक्षणहक्क यात्रा’ आंदोलन आयोजित केले होते. दरम्यान, आंबोली येथे रविवारी रात्री शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली. यावेळी या विषयाबाबतचे शंका निरसन त्यांनी केले. तर महाराष्ट्र शासनाने वाड्या-वस्तीवरील कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या पत्रामधील मजकुरामध्ये सुद्धा समूह शाळानिर्मितीचा हेतू हा विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, हा आहे. तसेच शाळा बंद करण्याचा हेतू नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

४००च्या आसपास आंदोलकांची हजेरी

यानंतर शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने २० पटांखालील शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांच्या घराच्या दिशेने आजरा येथून निघालेला लाँग मार्च दीपक केसरकर यांच्यासोबत समाधानकारक चर्चा झाल्याने व लेखी पत्र दिल्याने आम्ही तात्पुरता स्थगित करीत आहोत, अशी माहिती शाळा बचाव आंदोलक कॉ. संपत देसाई यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत जवळपास ४००च्या आसपास आंदोलकांनी हजेरी लावली होती.

Web Title: Dismissal of doubts by the Education Minister, Right to Education Yatra from Ajara suspended in Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.