महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन
By अनंत खं.जाधव | Published: October 5, 2024 04:45 PM2024-10-05T16:45:18+5:302024-10-05T16:46:44+5:30
'..नाहीतर कर्जाचा आकडा नऊ लाख कोटी पर्यत जाईल'
सावंतवाडी : महाराष्ट्रात निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून नवनवीन योजना आणल्या जात आहेत. पण योजना पूर्ण करायला यांच्याकडे पैसे नसल्यानेच आता रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळेच निवडणूका लवकर लागल्या पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल आणि ते आपणास परवडणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज, शनिवारी शरदचंद्र गटाची जाहीर सभा सावंतवाडीतील गांधी चौकात पार पडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.
बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार
जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंतच्या इतिहासात सध्या सुरू असलेला भष्ट्राचार जनतेने कधीच पाहिला नव्हता. हे इव्हेंटचे सरकार झाले आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाही आणि लाडकी बहीण योजना आणली. बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार पण सांगणार कोण? फक्त राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे. आता नव्या योजनासाठी सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळे निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत. कर्ज घ्याचे तरी बंद करतील नाहीतर राज्यावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल अशी भिती पाटील यांनी व्यक्त केली.
'पंधरा वर्षापूर्वीच्या घोषणा आजही पूर्ण झाल्या नाहीत'
पाटील यांनी यावेळी केसरकर यांच्यावर जोरदार टिका केली. दिवाळी आली तरी गणवेश नाही. यांना आता फक्त लाडका काॅन्ट्रकटर हवा आहे. पण मुलांचे गणवेश नको. मतदारसंघात पंधरा वर्षापूर्वी ज्या घोषणा केल्या त्या आज ही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच नवो आमदार हवो असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडवली.
गव्हाणे यांनी तर आपल्या तडाखेबाज भाषणातून सरकार वर जोरदार हल्ला चढवला आणि राज्यात बदल घडवलाच तरच हा महाराष्ट्र स्वाभिमानाने जगेल अन्यथा हे गद्दार आपला स्वाभिमान महाराष्ट्रा समोर गहाण ठेवतील अशी भिती व्यक्त केली. तर अर्चना घारे-परब यांनी जाणीव जागर यात्रेतून मला जनतेच्या समस्या कळल्या. आता या समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तुमचा आशिर्वाद हवा असे आवाहन केले. माजी मंत्री भोसले यांनी केसरकर यांनी फक्त घोषणा केली पुढे काय झाले ते त्यांनाच माहिती अशा शब्दात टिका केली. अमित सामंत, सुरेश दळवी यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच सुरेश दळवीच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.