एसटी विभागात कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कणकवलीत पणजी-कोल्हापूर एसटी रोखली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 11:52 AM2022-08-04T11:52:37+5:302022-08-04T11:55:31+5:30
एक तास पणजी-कोल्हापूर एसटी बस रोखून धरली
कणकवली : सिंधुदुर्ग विभागातील एसटीची बस कोल्हापूरात गेल्यावर त्या बस चालकाला दुय्यमपणाची वागणूक दिली जाते. बुधवारी एका वाहकाकडून मोबाईल व तिकिटाचे टिव्हीएम मशीन कोल्हापूर आगार व्यवस्थापकानी काढून घेतले.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर एसटी आगार व्यवस्थापकांविरोधात संताप व्यक्त करत कणकवली बसस्थानकात एक तास पणजी कोल्हापूर एसटी बस रोखून धरली होती. त्यामुळे एसटी विभागातील कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यांमधील वाद समोर आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बस कोल्हापूर येथे गेल्यानंतर त्यांच्या वाहन चालक व वाहकाना दुय्यम वागणूक मिळते.त्या ठिकाणी बसमध्ये प्रवाशी भरण्यास दिले जात नाहीत.तसेच त्यांची मोबाईल व तिकीटची टिव्हीएम मशीन काढून घेतली जातात. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यानी कणकवलीत एसटी बस रोखून धरली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
जोपर्यंत आगार व्यवस्थापक येत नाही तोपर्यंत बस सोडली जाणार नाही, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला होता. एसटी कर्मचारी कोअर कमिटी अध्यक्ष अंनत रावले,सचिव रोशन तेंडुलकर, गणेश शिरकर आदींसह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.