तंटामुक्तीवरूनच तंटे
By admin | Published: August 5, 2016 12:54 AM2016-08-05T00:54:23+5:302016-08-05T01:58:38+5:30
तंटामुक्ती योजना : पुरस्काराच्या रकमेवरून गावागावात वाद
ओरोस : महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेअंतर्गत अनेक गावांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत गाव तंटामुक्त करून लाखो रूपयांची पारितोषिके पटकावली. आता हीच पारितोषिकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींच्या मनमानी कारभारामुळे तंट्याचे कारण ठरली आहे. जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ही स्थिती आहे.
शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे जिल्ह्यात स्वागत करून जिल्ह्यातील सर्वच गावांनी या योजनेत सहभाग नोंदवला. गाव तंटामुक्त समित्या स्थापन होऊन गावातील तंटे गावातच तडजोडीने मिटविण्याचे प्रयत्न होऊ लागले. अनेकवेळा पोलिस स्टेशनला तक्रारी घेऊन जाणारे तंटामुक्त बैठकीतच त्यावर तोडगा काढू लागले. अशा तंट्यांचे निराकरण गावातील बैठकीतच होऊ लागले. गाव समित्यांमार्फत तडजोड करून आपापसात हे तंटे मिटविण्याचे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे पोलिस ठाण्यातही त्यांचा ताण कमी होऊ लागला. गावे आनंदाने नांदू लागली. वातावरण शांत झाले. याकरीता गावागावात नियुक्त झालेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपले गाव तंटामुक्त केले. यासाठी कोणतेही मानधन किंवा फायदा घेतला नाही. आपल्या गावाच्या विकासासाठी हे सर्व सदस्य एकत्र आले. यात सामान्य शेतकरी, शिक्षकवर्ग, नोकरदार, दुकानदार, पोलिस पाटील व ग्रामस्थ या सर्वांची मदत मिळत गेली. याच मदतीच्या जोरावर संबंधितांनी केलेल्या कामाची शासनाने दखल घेत गावांना पुरस्कार व पुरस्काराची रक्कम बहाल केली. गावे तंटामुक्त झाली. आता पुरस्कारापोटी मिळालेली रक्कमच तंटानिर्मितीचे आणि गावात अशांतता निर्माण होण्याचे कारण ठरत आहे. या रकमेचा विनियोग करताना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तत्कालीन तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामत: नागरिक पुरस्काराच्या विरूद्ध बोलत आहे. (वार्ताहर)
जनतेची मागणी : रकमेचे आॅडीट करणार का?
गाव तंटामुक्तीच्या माध्यमातून मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेचा शासनाच्या निकषानुसार विनियोग होत आहे का? जातीय सलोखा, जनजागृती, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात का? गावातील तंटामुक्तीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम आणि त्यावर झालेला खर्च, गाव सुरक्षा रक्षक व सुरक्षेच्या अनुषंगाने कोणते उपक्रम सुरू ठेवले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक स्तरावर मूल्यांकन करण्याची गरज आहे. याचवेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने आॅडिट करून नियमबाह्य खर्चावर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थ व जनतेतून होत आहे.
खर्चाचे निकष कोणते ?
महात्मा गांधी तंटामुक्त समित्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली येत नाहीत. यातील पदाधिकारी व सदस्य हे ग्रामसभेने निवड केलेले असतात. शिवाय या समित्यांवर शासकीय कर्मचारी व प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असतो. मात्र त्यांना डावलून अधिकार असलेले ग्रामपंचायतीचे सदस्य व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हा निधी मनमानी पद्धतीने खर्च करताना दिसत आहे. त्यातून गावातील शांतता बिघडत आहे.