प्रभारींकडून नगराध्यक्षांचा खुर्चीचा अवमान, सावंतवाडीतील नगरपालिकेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 02:59 PM2019-11-12T14:59:30+5:302019-11-12T15:01:15+5:30
सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रभारी नगराध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षांची खुर्ची तेथून हलवून इतरत्र ठेवली असा आरोप सावंतवाडी नगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.
सावंतवाडी: सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रभारी नगराध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षांची खुर्ची तेथून हलवून इतरत्र ठेवली असा आरोप सावंतवाडी नगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.
जोपर्यत नगराध्यक्षांची खुर्ची आहे. त्या जागेवर ठेवली जात नाही तोपर्यत आम्ही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाय ठेवणार नाही. असा इशारा लोबो यांनी दिला आहे. तसेच याबाबत आम्ही मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीही भेट घेणार असल्याचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी स्पष्ट केले आहे.
सावंतवाडीच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी शनिवारी येथील पालिका सभागृहात विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका भारती मोरे, शुभागी सुकी आदी उपस्थित होते.
नगरसेविका लोबो म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बहुतांशी विकास कामांबाबत कोणतीही माहिती घेतली नव्हती. मात्र गेले दोन दिवस आम्ही सर्व विकासकामांची माहिती घेत असून, अनेक कामे प्रगती पथावर आहेत. असे यावेळी सांगितले. तसेच संत गाडगेबाबा भाजी मंडईचे कामही लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
निवडणूक कधीही होऊ दे पण आम्ही सावंतवाडीवासियांना विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. तर सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर या काम करत आहेत. त्यांना आमचा अजिबात विरोध नाही. पण त्यानी काम करत असताना काही मूल्याची जपणूक करणे बंधनकारक आहे. त्यांनी नगराध्यक्षांची जी खुर्ची होती ती काढून टाकणे योग्य नाही.
आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही त्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून काम करा पण त्यांनी तसे न करता ती खुर्ची बाजूला केली हे कितपत योग्य आहे. मी स्वत: तसेच प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी यांनीही त्यांना कल्पना दिली होती. असे असताना त्यांनी तो मान राखला नाही. असा आरोप लोबो यांनी केला.
दोन खुर्च्यांमुळे फोन घ्यायला अडथळा होत होता : कोरगावकर
नगराध्यक्षांच्या खुर्चीचा कोणताही अवमान केला नाही. फक्त नगराध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावल्यामुळे मला फोन घेता येत नव्हता. तसेच बेल मारता येत नव्हती. यामुळेच ती खुर्ची बाजूच्या केबिनमध्ये ठेवली आहे. त्याचे एवढे राजकारण होईल, असे मला वाटले नव्हते. असे मत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले.