भरपाईदाखल १६ कोटींचे वितरण
By admin | Published: November 22, 2015 10:01 PM2015-11-22T22:01:19+5:302015-11-23T00:31:00+5:30
रत्नागिरी जिल्हा : अद्याप २४ हजार २१८ शेतकरी वंचित
रत्नागिरी : अवेळीच्या पावसामुळे जिल्ह््यातील आंबा, काजूचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाकडून पहिल्या टप्यात ७९ कोटी ५३ लाख २५ हजार २५० रूपयांच्या निधी नुकसानभरपाईसाठी जाहीर करण्यात आला होता. केवळ १६ कोटी १ लाख ८८ हजार ६१२ इतक्याच निधीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह््यातील ६४ हजार ८७४ एकूण लाभार्थ्यांपैकी ४० हजार ६५६ लाभार्थ्यांना नुकसानभरपाई वितरीत करण्यात आली असून, अद्याप २४ हजार २१८ शेतकरी प्रत्यक्ष नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे ७० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले होते. जिल्ह््याला अर्थार्जन मिळवून देणाऱ्या आंबा पिकाची जिल्ह््यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला. जिल्ह््यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. त्यापैकी ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे.याबाबत शासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले होते. ग्रामसेवक, कृषीसेवक व तलाठी यांच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामा अहवाल शासनाला सादर केला आहे. ६४ हजार ८७४ शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, ही यादी घाईगडबडीत तयार करण्यात आल्याने अनेक नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहिले होते. जिल्ह््याला ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपयांचा निधी नुकसानभरपाई म्हणून पहिल्या टप्यात जाहीर झाला.
परंतु, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चुकीच्या पंचनाम्याची बाब पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वंचित शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २४ हजार शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून, १६ कोटींच्या नुकसानभरपाईची वाढीव रक्कम शासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह््यासाठी एकूण ९५ कोटी ७३ लाख ७५ हजार इतका निधी नुकसानभरपाईसाठी जाहीर झाला आहे. मात्र, यातील १६ कोटी १ लाख ८८ हजार ६१२ इतक्याच निधीचे प्रत्यक्षात वितरण करण्यात आले आहे. सध्या २४ कोटींचे वितरण कागदोपत्री करण्यात आले आहे. सातबारावरील अनेक नावे व त्यांची परवानगी यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वितरण रखडले असतानाच अद्याप एकेरी सातबारावरील नुकसानभरपाईचे वितरणही रखडले आहे.
रत्नागिरी जिल्ह््यातील ६४ हजार ८७४ शेतकरी प्रत्यक्ष लाभार्थी असताना अद्याप ४० हजार ६५६ शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. महसूल विभागाकडे नुकसानभरपाई वितरणाचे काम देण्यात आले असून, वितरणाचे काम संथगतीने सुरू आहे.
शासनाने प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा तुटपूंजी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. ती देखील वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग निराश झाला आहे. शासकीय स्तरावर शेतकऱ्यांची करण्यात येणारी कुचेष्टा थांबवण्याची मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
तालुकाएकूणवंचित
लाभार्थीलाभार्थी
मंडणगड५४६४२८७२
दापोली८०७४६७१९
खेड६६२७३९७८
चिपळूण४५०७३०२०
गुहागर३८८६१९२९
संगमेश्वर१२४०८७९८८
रत्नागिरी१०७७५६२४२
लांजा१०२४५६११९
राजापूर२८२८१७८९
एकूण६४८७४४०६५६
रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानभरपाई वितरणाचे काम संथगतीने सुरु आहे. महसूल विभागाकडे हे काम देण्यात आले असून, अजूनही ४० टक्के लोकांना भरपाईचे वितरण करणे बाकी आहे.