आणिबाणी काळातील बंदीवासांना 34 जणांना 32 लाखांचे मानधन वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:08 PM2019-02-21T15:08:11+5:302019-02-21T15:09:42+5:30
आणिबाणीच्या काळात लोकशाहीकरिता बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 34 जणांना 32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग : आणिबाणीच्या काळात लोकशाहीकरिता बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 34 जणांना 32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राधान्याने हे धोरण राबवले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली.
सन 1975 ते 1977 या काळात देशात आणिबाणी लागू करण्यात आली होती. या आणिबाणीच्या काळात लोकशाहीकरिता बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे धोरण महाराष्ट्र शासन राबवत आहे. त्या अनुषंगाने आणिबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार रुपये मानधन व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस 5 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 5 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पती, पत्नीस अडीच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. मिसा अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तींना मानधन मंजूर करण्याचा अधिकारी जिल्हाधिकारी यांना आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिसा अंतर्गत अटक झालेल्या 34 व्यक्तींना मानधन वितरीत करण्यात आले आहे.
या अंतर्गत आतापर्यंत एकूण 32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली.