‘वितरण’चा ग्राहकांना जोरदार करंट
By admin | Published: December 4, 2015 11:35 PM2015-12-04T23:35:33+5:302015-12-05T00:22:02+5:30
तळेरेच्या ग्राहकाचे बिल तब्बल ३१ हजार : कासार्डे, साळीस्ते परिसरातही तीच स्थिती
नांदगाव : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा अनेकवेळा वीज ग्राहकांना फटका बसत असल्याचा नेहमीचाच अनुभव आहे. तळेरे बाजारपेठ येथील एका ग्राहकाला चक्क महिन्याचे बिल ३१,०२० रुपयांचे देऊन कंपनीने जोरदार करंट दिला. यासह अनेकांना वाढीव वीजबिल आल्याचाही चर्चा ऐकायला मिळत आहे. आॅक्टोबरची वीजबिले भरमसाठ आल्याचे चित्र तळेरे, कासार्डे, साळीस्ते परिसरात दिसून येत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे अनेकांनी धाव घेतली आहे.वीज कंपनीचे काही वर्षापूर्वी दर तीन महिन्यांनी वीजबिल यायचे. त्यावेळी काही प्रमाणात वीजबिल व्यवस्थित असायचे. मात्र, त्यानंतर डिजिटल मीटर बसविण्यात आले आणि दर महिन्याला बिल येऊ लागले. याचा फायदा कंपनीला होऊ लागला. पूर्वी दर तीन महिन्यांनी येणारे वीजबिल आता तेवढेच दर महिन्याला येऊ लागले.तळेरे येथील एका वीज ग्राहकाचे तब्बल ३१ हजार, तर साळीस्ते येथील एका ग्राहकाचे १८ हजारांचे वीजबिल आले आणि ते हैराण झाले. ग्रामीण भागात घरगुती वापराचे एवढे बिल येऊ शकते का? एवढा साधार विचारही कंपनी करत नाही का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाय नेहमीप्रमाणेच रीडिंगमध्ये गफलत असल्याचेही निदर्शनास येते. वीजबिलावरील मीटरचा फोटो तर नावालाच असल्याचे काही वीजबिलांवरील फोटो पाहून
समजते.
आर्थिक भुर्दंड
डिजिटल मीटर हे वीज ग्राहकांच्या हिताचे न होता त्यांना आर्थिक भुर्दंड ठरत आहेत. अलीकडे वाढीव बिल येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तळेरे, साळीस्ते, कासार्डे परिसरातील ग्राहकांनी बोलून दाखविले. अशाप्रकारे वारंवार वाढीव बिलाचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
आंदोलन छेडण्याचा इशारा
अशाप्रकारे दरवेळी ग्राहकांना सोसावा लागणाऱ्या भुर्दंडाविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. मागील वीजबिल नियमित भरलेले असतानाही काही ग्राहकांना एखादी मुदत संपल्यानंतरही वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही केली जाते. विशेष म्हणजे प्रामाणिक ग्राहकांनाच नियम दाखविला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.