शिरंगे धरणग्रस्तांची पाण्यासाठी वणवण, तीन वर्षांपासूनची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:38 AM2019-05-08T10:38:00+5:302019-05-08T10:39:52+5:30
महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २५
दोडामार्ग : महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
२५ लाख रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजलमधून विहिर व पंपहाऊस बसविण्यात आला खरा, मात्र पाईप लाईन टाकण्यासाठी निधीच नाही अशा अवस्थेत गेल्या तीन वर्षापासून शिरंगे धरणग्रस्त पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या धरणासाठी ग्रामस्थांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. घरादारावर पाणी सोडले, या धरणग्रस्तांचे पुनर्वसन खानयाळे येथे करण्यात आले. मात्र, ज्यांनी धरणासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्याच धरणग्रस्तांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात ही परिस्थिती निर्माण होते. मात्र प्रशासन आणि जनतेचे कैवारी म्हणवणारे राजकीय पुढाऱ्यांनी मात्र त्याकडे कानाडोळा केला आहे.
शिरंगे पुनर्वसन गावची लोकसंख्या जेमतेम ५०० च्या आसपास आहे. या ठिकाणी पुनर्वसन झाल्यावर पुनर्वसन विभागाने गावठाणचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण केले आणि बोडण ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सण २०१६-१७ मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजलमधून २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र पाईपलाईन टाकण्यासाठी निधिच नसल्याने नळयोजनेचे काम रखडले. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून शिरंगे पुनर्वसनवासियांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
विहिरींनी गाठला पाण्याचा तळ
सध्या पूनर्वसन गावठणात तीन विहिरी आहेत. त्यापैकी दोन विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. जेमतेम आठ दिवस पुरेल एवढेच पाणी त्यात शिल्लक आहे. तर राष्ट्रीय पेयजलच्या विहिरीत पाणी मुबलक आहे. मात्र तीन वर्षांपासून त्यातील पाणी उपसा व गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत शिरंगे धरणगस्तांची व्यथा दूर करण्याचे सोयरसुतक कोणालाच नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्यावरच पाण्यासाठी दारोदारी फिरावे लागत असल्याने धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
शिरंगे पुनर्वसन गावठणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या आहे. मात्र ती दूर करण्याच्यादृष्टीने कोणतीच पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. परीणामी चालू वर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी धरणग्रस्तांमधून केली जात आहे.