CoronaVirus In Sindhudurg : जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण राबवावे : संजीव लिंगवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 PM2021-05-29T16:23:33+5:302021-05-29T16:24:58+5:30
CoronaVirus In Sindhudurg : महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण न राबविल्यास जिल्ह्यात धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे.
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण न राबविल्यास जिल्ह्यात धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक ३१.३६ टक्के व सातारा जिल्ह्याचा दुसऱ्या क्रमांकावर २०.०२ टक्के इतका होता. जिल्हा प्रशासनाच्या अकार्यक्षम कारभारामुळे कोरोना पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा ह्यरेड झोनह्णमध्ये दाखल झाला असून, कोरोना रोखण्यात संपूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील मृत्यूदर कायम असून शेकडो कुटुंब नेस्तनाबूत होत आहेत.
ग्रामीण भागात दोन-चार गावांत फक्त एकच आरोग्य सेवक असलेल्या व बऱ्याच रंगविलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्र, उपकेंद्र यात डॉक्टर व पुरेसा आरोग्य कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागात पुरेशी कोरोना जनजागृती होत नाही. परिणामी खूप रुग्ण अजूनही घरात व गावात मोकाट फिरत आहेत.
संपूर्ण राज्यात होमिओपॅथी डॉक्टर यांची भरती कोविडसाठी होत असतानाही व जिल्ह्यात जवळपास चारशे होमिओपॅथिक डॉक्टर असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतीत होमिओपॅथी डॉक्टरना डावलले. पुरेशा खाटांची व्यवस्था नसतानाही होम विलगीकरण बंद करणे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांच्यात सुसंवादातून निर्णय नसणे.
योग्य निर्णय घेण्यात अकार्यक्षम प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांचा जिल्हा प्रशासनावर अंमल नसणे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्टरना साठ हजार ते पंचेचाळीस हजार मानधन असताना जिल्ह्यात आयुर्वेदिक डॉक्टरना फक्त तीस हजार रुपये मानधन देऊन कोविड वॉर्डात बारा-बारा तासांच्या ड्युट्या देणे. जिल्हा रुग्णालयात कर्मचारी वर्गाना चुकीच्या पद्धतीने हाताळणे व अधिकारी वर्गावर अंमल नसणे आदी अनेक कारणांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यास कुचकामी ठरली आहे.
यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणे व जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण वेळीच न राबविल्यास परिस्थिती अजूनही चिंताजनक होण्याची शक्यता असल्याचा इशारा डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे. तर, रुग्णसंख्येचा विचार करता राज्यात सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी दुसऱ्या तर कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.