जिल्हाभर ओल्या काजूगरांची आवक लक्षणीय वाढतेय
By admin | Published: February 20, 2015 10:18 PM2015-02-20T22:18:28+5:302015-02-20T23:13:43+5:30
बाजारपेठेत उलाढाल : हमखास उत्पन्न देणारा पर्याय बागायतदारांना उपलब्ध
फुणगूस : हापूस आंब्याबरोबरच काजूगराचे नाव निघताच कोकणची आठवण होते. काजूच्या झाडाला मोहोर आल्यानंतर कोकणवासीयांना प्रतीक्षा असते ती ओल्या काजूगरांची. सध्या बाजारपेठेत तोंडाला पाणी सुटणाऱ्या व खरेदीचा मोह न आवरता येणाऱ्या ओल्या काजूगरांची आवक सुरु झाली असून, दर मात्र चांगलाच वधारलेला आहे.
कोकणात काजूची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी मोहोर येण्याची प्रक्रिया काहीशी विलंबाने सुरु झाली. त्यामुळे पहिल्या उपऱ्याचा ओला काजूगर बाजारपेठेत येण्यास उशीर होणार याचा खवय्यांना अंदाज होता. कोवळ्या काजूगरांची चव न्यारी असते. मूठभर ओले व कोवळे काजूगर जिभेवर ठेवले तरी समाधान होत नाही, अशी त्याची अवीट चव आहे.
ओल्या काजूची झणझणीत उसळ व जोडीला गरमागरम भाकरी हे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान कोकणात येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी विशेष भोजन असते. सध्या अधिकतर माळरानावर असणाऱ्या काजूच्या झाडांना हिरव्यागार बियांचे घड लगडलेले दिसून येत आहेत. ओल्या बिया व काजूगर बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहेत. ओल्या काजूबियांचा दर ६० ते ७० रुपये किलो तर ओल्या काजूगरांचा एका पानाचा दर ४० रुपये एवढा वधारलेला आहे.
काजूच्या उसळीबरोबरच मटणामध्ये ओले काजूगर घातले जातात. हे काजूगर या पदार्थाची चव वाढवत असल्याने ओल्या काजूगरांना बाजारपेठेत कायम मागणी असते. कोकणात ठिकठिकाणी असणारा कातकरी समाज या हंगामात काजूगर पानावर काढून विकण्याचे काम करतो. काजूवृक्षांची स्वत:ची लागवड नसताना काजूगर विकण्याची किमया या कातकरी मंडळींना कशी काय साध्य होते, हे न उलगडणारे कोडे आहे. एका पानावर २० ते २५ ओले काजूगर असतात. बाजारपेठेत आवक वाढली की, सुरुवातीला ४० रुपये असणारा दर घसरतो.
या हंगामातील काजूगर नवे करण्यासाठी ओल्या काजूचा दर चढा असूनही तो मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. या भागात आता ओल्या काजूगरांची आवक लक्षणीय वाढ होत असल्याने आता या भागात ओल्या काजूगरांना मागणी वाढत आहे. (वार्ताहर)