जिल्हा बॅँक निवडणूक बिनविरोध ?

By admin | Published: April 12, 2015 11:10 PM2015-04-12T23:10:23+5:302015-04-13T00:03:02+5:30

जिल्ह्यात उत्सुकता : उपाध्यक्ष जाधवांची ‘संकटमोचक’ची भूमिका

District bank election uncontested? | जिल्हा बॅँक निवडणूक बिनविरोध ?

जिल्हा बॅँक निवडणूक बिनविरोध ?

Next

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजपचे सहकार पॅनेल आणि शिवसेनाप्रणित शिवसंकल्प पॅनेल आमने-सामने उभे ठाकले आहे. दुसरीकडे निवडणूक अर्ज भरल्यानंतरही ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सहकार पॅनेलकडून सुरू आहेत. त्यासाठी बॅँकेचे विद्यमान उपाध्यक्ष बाबाजी जाधव ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका बजावत असून, शिवसेनेला किती जागा दिल्या तर निवडणूक बिनविरोध होण्याबाबतचे ‘मिरॅकल’ घडेल, याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे.  जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तब्बल आठ वर्षांनंतर येत्या ५ मे रोजी होत आहे. या निवडणुकीची तयारी शिवसेनेने गेल्या दोन महिन्यांपासूून सुरू केली आहे, तर सत्ताधारी सहकार पॅनेलने गेल्या वर्षभरातच या निवडणुकीसाठी आवश्यक व्यूहरचना केली आहे. जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी प्रथमपासूनच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.
पक्षीय पातळीपेक्षाही सर्वपक्षीय म्हणून प्रतिनिधित्व देत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चोरगे यांची अपेक्षा होती. मात्र, ४० व ६० टक्के हे जागावाटपाचे सूत्र स्वीकारण्याचा आग्रह सेनेने धरल्याने बिनविरोध निवडणुकीचा मुद्दा मागे पडला होता. आपल्याबरोबर चर्चाच झाली नाही, असा दावा शिवसंकल्प पॅनेल उभे करणारे माजी आमदार सुभाष बने व माजी आमदार गणपत कदम यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर सर्व २१ जागांवर शिवसेनेच्या पॅनेलने उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, तांत्रिक कारणाने विलास किंजळे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनेलचे २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बॅँकेची निवडणूक या दोन्ही पॅनेलमध्ये होणार हे निश्चित झालेले असतानाच आता पुन्हा पहिल्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याची मुदत २७ एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे अजूनही चर्चेतून जागावाटपाचा तिढा सुटू शकतो, संबंधितांना निवडणुकीतून माघार घेता येऊ शकते, असा सहकार पॅनेलमधील काही नेत्यांना विश्वास वाटत आहे. त्यादृष्टीनेच विद्यमान उपाध्यक्ष जाधव हे दोन्ही पॅनेलमधील संकटमोचक म्हणून काम करीत असून, शिष्टाईचे प्रयत्न सुरू आहेत.

सहकारावर ‘सहकार’चेच वर्चस्व
जिल्ह्यात शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांत सहकाराकडे फारसे लक्ष दिले नाही. निवडणूक जाहीर झाली की त्यात उतरायचे ही परंपरा शिवसेनेने यावेळीही पाळली आहे. मात्र, सहकार पॅनेलमधील सर्वच विद्यमान संचालक हे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यामुळेच त्रिपक्षीय सत्ताधारी ‘सहकार’ पॅनेलचे वर्चस्व आहे. तरीही आरोप-प्रत्यारोपात ऊर्जा वाया जाऊ नये, असे डॉ. चोरगे यांच्यासह अनेक संचालकांचे मत आहे. त्यामुळेच बिनविरोधचा हा नवा फंडा पुढे आला आहे.

जिल्हा बॅँक निवडणूक अजूनही बिनविरोध होऊ शकते. तसे आमचे प्रयत्न सुरू आहेत. सहकार पॅनेलने याआधीच दिलेल्या प्रस्तावानुसार शिवसेनेच्या नेत्यांनी योग्य विचार करून निर्णय घेतल्यास हे शक्य आहे. आम्ही आशावादी आहोत. जिल्हा बॅँक ही राजकारणविरहित असावी, असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. सहकार पॅनेलमध्ये राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजपचेही उमेदवार आहेत. शिवसेनेनेही त्यात सन्मान्य तोडगा काढत सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- बाबाजी जाधव, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, रत्नागिरी.

Web Title: District bank election uncontested?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.