आघाडी सरकारचा जिल्हा भाजपाच्यावतीने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:46 IST2021-07-07T15:45:41+5:302021-07-07T15:46:42+5:30
Bjp Sindhudurg : भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

निषेध नोंदविणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे देण्यात आले. (छाया : मनोज वारंग)
ओरोस : भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भेट घेतली. यावेळी शासनाने केलेल्या या निलंबनाबाबत निवेदन देऊन निषेध नोंदविला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा परिषद गटनेते रणजीत देसाई, मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व रूपेश कानडे उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे.
जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता, भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो, पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये, केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे.
या सरकारचा निषेध आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. आमचे हे निवेदन जनतेशी कसलेच सोयरसुतक न राहिलेल्या या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे पोहोचवावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदरचे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.