जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पुरस्कार जाहीर
By admin | Published: August 15, 2016 12:18 AM2016-08-15T00:18:39+5:302016-08-15T00:18:39+5:30
मधु मंगेश कर्णिक यांना जीवनगौरव : ३१ आॅगस्ट रोजी पुरस्कारांचे वितरण
कणकवली : सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने विविध पाच पुरस्कार देण्यात येणार आहेत. यापैकी स्व.बाळासाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.
यासह इतर पुरस्कारांची घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बँकेच्या कणकवली शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी बँकेचे संचालक आर. टी. मर्गज, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आनंद सावंत तसेच पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी सतीश सावंत यांनी पुरस्कार देण्यामागची बँकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सहकार क्षेत्रात विविध माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात यावेत. अशी संचालकांची मागणी होती. त्यानुसार पुरस्कार निवड समिती नियुक्त करण्यात आली होती.
या समितीत भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, प्रा. अरुण पणदूरकर, जिल्हा बँकेचे माजी सरव्यवस्थापक एस. ए. मणेरीकर, सेवानिवृत्त सहकार अधिकारी महेश्वर रायकर, रविंद्र आठलेकर यांचा समावेश होता. या समितीने चार पुरस्कारांसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी केली. तसेच प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले. त्यानंतर पुरस्कारासाठी संस्था तसेच व्यक्तींची निवड केली आहे.
सहकार क्षेत्रात चांगले काम केलेल्या व्यक्तींच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच त्यांच्या कामाची आठवण म्हणून हे पुरस्कार देण्याचे बँकेने निश्चित केले आहे. या पुरस्कारामुळे सहकारक्षेत्रात चांगले काम करण्याची चढाओढ लागेल आणि पर्यायाने सिंधुदुर्गचा विकास अधिक जोमाने होईल. हा उद्देशही पुरस्कार देण्यामागे आहे. जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले नव्हते. तर सर्वानुमते तो पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सावंत यांनी सांगितले.(वार्ताहर)
पुरस्कारप्राप्त मानकरी
जिल्हा बँकेच्यावतीने दिला जाणारा ‘शिवरामभाऊ जाधव स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेला, शिक्षणमहर्षी केशवराव राणे स्मृतीप्रित्यर्थ ‘उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार’ मारुती पांडुरंग पाटील (मेढा,मालवण) यांना, डी.बी. ढोलम स्मृतीप्रित्यर्थ ‘उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार’ पांडुरंग विष्णू दळवी, खासगी सचिव श्री गिरेश्वर प्रासादिक विकास सेवा सोसायटी (वजराठ,वेंगुले) यांना तर भाईसाहेब सावंत स्मृतीप्रित्यर्थ ‘कृषिमित्र पुरस्कार’ बाळकृष्ण गणेश गाडगीळ (वेतोरे, वेंगुर्ले) यांना जाहीर झाला असल्याचे सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.