सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू; ..'यामुळे' जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:00 PM2022-07-29T12:00:51+5:302022-07-29T12:09:04+5:30
कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जुलै पासून १२ ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ जुलै ते ९ ऑगस्ट रोजी मोहरम उत्सव, २ ऑगस्ट रोजी नागपंचमी,११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा सण पारंपारिक पद्धतीने साजरे होणार आहेत. तसेच कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ जुलै रोजी सुरू झाली असून १२ ऑगस्ट पर्यंत ती सुरू राहणार आहे. तसेच माध्यमिक शालांत्न परीक्षा प्रमाणपत्र परीक्षाही १२ ऑगस्ट पर्यंत आहे.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून अचानकपणे मोर्चा, वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, निदर्शने, रास्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.