सावंतवाडीकरांना दिलासा! करवाढीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती; मंत्री दीपक केसरकरांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी
By अनंत खं.जाधव | Published: March 7, 2023 05:36 PM2023-03-07T17:36:16+5:302023-03-07T17:39:08+5:30
'चांगले काम करणारा अधिकारी असा माझा समज होता'
सावंतवाडी : शहरातील करवाढ करताना मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला विश्वासात घेतले पाहिजे होते. तालुक्यात जनतेचा एकमेव लोकप्रतिनिधी सध्या कार्यरत आहे. असे असताना मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेणे चुकीचे होते. चांगले काम करणारा अधिकारी असा माझा समज होता अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधातील नाराजी बोलून दाखवली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी वाढीव करवाढीला जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिल्याचेही स्पष्ट केले.
मंत्री केसरकर म्हणाले, नगरपालिकेने वाढीव कराबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली होती. मात्र हे सर्व करत असताना एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी यांनी कल्पना देणे गरजेचे होते. ही कर वाढ वाजवी आहे की कसे? याबाबत मी खात्री करणार आहे. नगरपरिषदेवर आर्थिक बोजा असून तो पैसा करवाढीतून काढण्यात येणार आहे असे जर मुख्याधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यानी इतर मार्गाने पैशाची तरतूद करणे गरजेचे, करवाढीतून नागरिकांवर बोजा कशासाठी असा सवाल मंत्री केसरकरांनी केला.
सावंतवाडी शहराच्या सुधारित नळ योजनाला ५७ कोटी रुपये लागणार आहेत त्यासाठी दोन कोटी ८७ लाख रुपये लोक वर्गणीतून भरावे लागणार आहेत. असे असेल तरी जनतेच्या माथ्यावरच कर बसणार आहे. त्यामुळे दोन कोटीची नळ योजना आणण्यात येईल. सावंतवाडी शहरात जिमखाना मैदानावर पॅव्हेलियन तसेच अद्यावत भाजी मंडई उभारण्यात येणार आहे त्यातून अतिरिक्त पैसे पालिकेला मिळेल असे मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर व मुंबईचा पालकमंत्री असल्याने तसेच सतत कामाच्या व्यापामुळे सावंतवाडी शहरावर दुर्लक्ष झाले आहे. मात्र यापुढे आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यात येणार आहे. कोट्यावधी रुपये शहराला दिल्यानंतर मी खरेतर यायची गरज नाही पण आता यावेच लागणार. अधिकारी मनमानी करत असतील गप्प बसून चालणार नाही असे सांगत मोती तलाव हे शहराचे वैभव आहे. मी नगराध्यक्ष असताना येथील सर्व अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्यात यावा असे निर्देश पालिकेला दिले असून त्यावर आपण ठाम आहे. मात्र नागरिकांवर, स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असेही केसरकर म्हणाले.