जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रॅपलिंगचा आनंद
By admin | Published: May 4, 2015 12:32 AM2015-05-04T00:32:54+5:302015-05-04T00:36:13+5:30
रत्नागिरी पर्यटन महोत्सव : सुमारे ८५ नागरिकांचा सहभाग
रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने शहरानजीकच्या भाट्ये येथे आयोजित केलेल्या रॅपलिंग उपक्रमात आज दुसऱ्या दिवशी सुमारे ८५ नागरिकांनी सहभाग दर्शविला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पालगडचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड यांच्यासह त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनीही रॅपलिंगचा आनंद घेतला.
पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधून शहरानजीकच्या भाट्ये येथील झरीविनायक मंदिराजवळ येथील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या साहसी खेळांचे आयोजन करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने रॅपलिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी यात ७ ते अगदी ५० पर्यंतच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. सकाळी ९.३० ते दुपारी २ आणि पुन्हा ४ ते ६ या वेळेत हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला होता. यात मुलींची संख्या लक्षणीय होती, हे विशेष.
आजही रॅपलिंगला पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्व वयोगटातील नागरिक यात सहभागी झाले होते. दुपारच्या दरम्यान जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनीही या रॅपलिंगमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवून आनंद घेतला. आजही रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्थेचे संजय खामकर, जितेंद्र शिंदे, किशोर सावंत, वीरेंद्र वणजु, पपा सुर्वे, शेखर मुकादम, महेंद्र तोडणकर आदी पदाधिकारी दिवसभर जातीने उपस्थित होते. आज सकाळी ९.३० वाजता सुरू झालेला हा उपक्रम सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होता. खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनीही आपल्या यात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)