जिल्ह्यात संततधार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 10:54 PM2017-07-18T22:54:14+5:302017-07-18T22:54:14+5:30
जिल्ह्यात संततधार कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग : सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या आणि मंगळवारी दिवसभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्हावासीयांची दाणादाण उडाली आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेरी, दुकानवाड, पुळास येथील कॉजवे पाण्याखाली गेले असल्याने माणगाव खोऱ्यातील तब्बल २७ गावांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. या पसिरातील शाळाही लवकर सोडून देण्यात आल्या असून, रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने काही गावे संपर्कहीन झाली आहेत. तसेच तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बांदा परिसरात अनेक गावांत पूर आला होता. भंगसाळ नदीला पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कुडाळ शहरातील डॉ. आंबेडकरनगर येथील सुमारे १५ घरांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
सावंतवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्ता खचला. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर दुसरीकडे तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली असून, शहरातही काही घरांमध्ये पाणी घुसले. रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. सावंतवाडीतून सुटणाऱ्या अनेक एस.टी. बसेस रद्द करण्यात आल्या. कोंडुरा तसेच तळवडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत असल्याने जणू ढगफुटी सारखाच भास होत होता. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने एकच तारांबळ उडाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने माणगाव खोऱ्यातील दुकानवाड परिसरातील कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. तसेच जिल्ह्यातील विविध सखल भागात पाणी साचले आहे.
तिलारी नदीवरील घोटगेवाडी, कुडासे या कॉजवेवर पाणी आले. तर तिलारी-घोटगेवाडी रस्त्यावरील भटवाडी कॉजवे देखील दिवसभर पाण्याखाली होता. मोर्ले, घोटगेवाडी, केर, निडली व भेकुर्ली गावांचा संपर्क तुटला होता.
भेडशी येथील कॉजवेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. तालुक्यातील आयी, उसप, झरेबांबर, खोक्रल या गावांतील वाहतूक ठप्प झाली होती. विर्डी व झोळंबे येथे घराची पडझड झाल्याने नुक सान झाल्याचे वृत्त होते
तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणात संकल्पित पूर्ण क्षमतेचा पाणीसाठा होत असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या पावसामुळे तिलारी नदीत खरारी नाल्याचे पाणी येत असून, नदी तुडुंब भरून वाहत आहे. या पाण्यामध्ये तिलारी धरणाचे अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार असल्याने पाणी नदीपात्राबाहेर पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मालवणमध्ये
पडझडीच्या घटना
मालवण शहरासह तालुक्याला वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळी वाऱ्यांचा जोरही वाढल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या. शहरात देऊळवाडा व मेढा परिसरात वीज खांब जमीनदोस्त झाल्याने रात्री उशिरापर्यंत विजेचा खेळखंडोबा सुरू होता. किनारपट्टी भागही महाकाय लाटांनी हादरवून सोडला आहे.
घरावर भिंत कोसळून
महिला गंभीर जखमी
वेंगुर्ले तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसाने शहरातील दाभोसवाडा येथील डोेंगराळ भागात राहणाऱ्या विल्फ्रेड फिलिप्स फर्नांडिस यांच्या घरावर कालिंद इशेद फर्नांडिस यांच्या घराची भिंत कोसळली. यात गॅसवर चहा बनविणारी पेरपेतीन फर्नांडिस गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४.४५च्या सुमारास घडली.
एस. टी. बस अडकल्या
माणगाव खोऱ्यातील बहुतांशी कॉजवे पाण्याखाली गेल्यामुळे सावंतवाडीतून माणगाव-फुटब्रीजकडे जाणारी एस. टी. सायंकाळपर्यंत पुन्हा आली नाही. काही काळ चालक व वाहक यांच्याशी संपर्कही होत नव्हता. मात्र, सायंकाळी उशिरा संपर्क झाला. पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पुन्हा एस.टी. बस सावंतवाडीकडे आली नसल्याचे स्पष्ट केले. सावंतवाडीहून शिवापूरकडे जाणारी एस.टी. बस आंबेरी येथे थांबवून ठेवण्यात आली होती.
येत्या ४८
तासांत अतिवृष्टी
येत्या ४८ तासांत कोकण किनारपट्टी भागासह जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार सर्व यंत्रणांना आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.