..तरच जिल्हा परिषद पारदर्शी बनेल

By admin | Published: June 28, 2016 09:10 PM2016-06-28T21:10:19+5:302016-06-28T21:12:10+5:30

जान्हवी सावंत यांचा टोला : सभापतींच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत?

The district council will become transparent | ..तरच जिल्हा परिषद पारदर्शी बनेल

..तरच जिल्हा परिषद पारदर्शी बनेल

Next

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेत सर्व ठिकाणी कॅमेरे बसवून कारभार पारदर्शक केला असे म्हणणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींच्या दालनात सीसीटीव्ही का नाहीत? तसेच टपाल शाखेशी ही दालने का जोडली गेली नाहीत, असा सवाल जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत यांनी उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांच्या दालनात चालणारे व्यवहार जेव्हा कॅमेऱ्यात टिपले जातील, तेव्हाच खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. येथील पत्रकार कक्षात
आयोजित पत्रकार परिषदेत जान्हवी सावंत बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासह डॉ. प्रवीण सावंत उपस्थित होते.
जान्हवी सावंत म्हणाल्या, जिल्हा परिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून आणि जिल्हा परिषदेचा कारभार डिजिटल करून जिल्हा परिषदेने पारदर्शकतेत टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. मात्र, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची दालने या पारदर्शकतेत बसवली गेली नसल्याने एकूण पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काही सभापतींच्या दालनात काहीवेळा हाणामारीचे प्रसंग होतात. हे प्रसंग टिपण्यासाठी अशा कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका सभापतीच्या दालनात हाणामारीचा प्रसंग उद्भवला होता. अशा प्रकारचा प्रसंग उद्भवल्यास नक्की दोषी कोण हे ठरविण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, असे प्रसंग चव्हाट्यावर येऊ नयेत, यासाठीच हे कॅमेरे त्यांच्या दालनात नाहीत, का आणखी काही गौडबंगाल आहे म्हणून ही दालने वगळली गेली असावीत, असाही सवाल त्यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी करून त्यांना सेवा हमी देण्यासाठी सी. आर. यु. पद्धती जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. या सेंट्रलाईज टपाल युनिट पद्धतीतही या पदाधिकाऱ्यांकडे येणाऱ्या पत्राबाबतची माहिती दिली जावी, अशीही मागणी केली असल्याचे जान्हवी सावंत यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)


भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा आॅडिट करा
जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा थेट आॅडिटच लावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. ही मागणी यापूर्वीच आपण केल्याचे जान्हवी सावंत यांनी सांगितले.

Web Title: The district council will become transparent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.