आधी म्याव म्याव, आता धावाधाव...; नीतेश राणेंचा जिल्हा काेर्टाने जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:57 AM2021-12-31T06:57:21+5:302021-12-31T06:57:52+5:30
Nitesh Rane : स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आमदार राणे व सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी तिसऱ्या दिवशी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळून लावला आहे. यात राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयिताना अटक केली आहे. यामध्ये स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आमदार राणे व सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
उच्च न्यायालयात जाणार : ॲड. देसाई
आमदार नीतेश राणे यांनी नेहमी पोलिसांना त्यांच्या कामकाजात सहकार्य केले आहे. मात्र, आज मोबाईल हस्तगत करण्याचे कारण देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. तोपर्यंत तरी आमदार राणे पोलिसांसमोर हजर होणार नसल्याचे ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले.
माेबाईल हस्तगत करणे गरजेचे
या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे, तसेच याची खास चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत आहाेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.