जिल्हा विकासातही ‘नंबर वन’ बनवूया

By Admin | Published: October 7, 2016 09:46 PM2016-10-07T21:46:17+5:302016-10-08T00:02:08+5:30

दीपक केसरकर : कणकवली येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप

In the district development, make 'number one' | जिल्हा विकासातही ‘नंबर वन’ बनवूया

जिल्हा विकासातही ‘नंबर वन’ बनवूया

googlenewsNext

कणकवली : कोणीही कितीही टीका केली तरी त्याला शब्दांच्या माध्यमातून नव्हे, तर कृतीतूनच उत्तर द्यायला पाहिजे, असे मी मानतो. दिव्यांगांना नुसते साहित्य वाटप करून न थांबता त्यांच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजेत, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा फक्त स्वच्छतेच्या बाबतीतच नव्हे, तर विकासाबाबतीतही एक नंबर बनावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
भारत सरकार सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने येथील भगवती मंगल कार्यालयात शुक्रवारी दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. एस. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. चोपडे, रवींद्र शेट्ये, राजन चिके, सचिन सावंत, आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्र तसेच राज्य शासनाची प्रत्येक योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या टप्प्यात २५०० दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने विकासाबाबतीत चांगले काम केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. वागदे येथील महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न वैभव नाईक यांनी उचलून धरला होता. त्यामुळे शासनाने ६० ऐवजी ४५ मीटर महामार्ग रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
माधव भंडारी म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे करतानाच त्यांना प्रशासनाने कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे. या कामात लोकप्रतिनिधीही सहकार्य करतील. सिंधुदुर्गची जबाबदारी आता वाढली असून, स्वच्छतेच्या बाबतीत सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
वैभव नाईक म्हणाले, अपंगांना शासकीय नोकरीत आरक्षण आहे. या आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न राहातील. शासनाच्या योजना जनतेपर्यंत अनेकवेळा पोहोचत नाहीत. मात्र, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित काम केले तर योजना यशस्वी होतात. याचे आजचा कार्यक्रम हे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. योगेश साळे तर सूत्रसंचालन सूर्यकांत वारंग यांनी केले. आस्था सर्पे, शेखर सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे १४ रोजी अनावरण !
गृहराज्यमंत्री या नात्याने येथील जनतेला सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी माझे प्रयत्न आहेत. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी अशा प्रमुख शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, त्यांचे अनावरण १४ आॅक्टोबरला करण्यात येणार आहे. गावात दारूभट्टी सुरू असेल तर ग्रामस्थांनी फक्त एक फोन पोलिस ठाण्यात करावा, तत्काळ कारवाई करण्यात येईल. युवतींची छेड काढणाऱ्यांसाठीही कडक धोरण ठरविण्यात आले असल्याचे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.
दाखल्याची प्रक्रिया सुलभ करणार !
दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून सुविधा मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून देण्यात येणाऱ्या दाखल्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. तसेच एकही दिव्यांग व्यक्ती या सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी सांगितले.

Web Title: In the district development, make 'number one'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.