सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार
By admin | Published: June 18, 2014 12:35 AM2014-06-18T00:35:32+5:302014-06-18T00:59:02+5:30
पावशी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली असून आज, मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८२.९५ च्या सरासरीने ६६३.६० मि.मी. पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे, तर येत्या ७२ तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
समुद्रात ताशी ४५ ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पावशी येथे रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, आतापर्यंत २९७.८०च्या सरासरीने २३८२.४० मि.मी. पाऊस पडला आहे, तर आज सकाळी ८ वाजेपर्यंत ८२.९५ च्या सरासरीने ६६३.६० मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग ९९ (२७८) मि.मी., सावंतवाडी १२२ (३२२), वेंगुर्ला ८०.६० (२९१.४०), कुडाळ ७१ (३२२), मालवण ११८ (५१५), कणकवली ७४ (२०५), देवगड ३८ (२३०), वैभववाडी ६१ (२१९) मि.मी. पाऊस
पडला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)