स्वच्छतेत जिल्ह्याचे काम चांगले : कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:34 AM2021-02-03T11:34:05+5:302021-02-03T11:37:43+5:30
zp sindhudurg- स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व्यक्त केली.
ओरोस : स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक शासनाच्या प्रत्येक योजनेत चांगले काम करतात. स्वच्छतेत या जिल्ह्याने चांगले काम केल्याने आपण या जिल्ह्याच्या प्रेमात पडलो. हागणदारीमुक्त अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढे मोठे काम केले की राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारण्यासाठी जाण्याकरिता रेल्वेचा डबा आम्हांला आरक्षित करावा लागला होता. कर वसुलीत तर या जिल्ह्याचा हात कोणीच धरू शकत नाही.
डॉ. कलशेट्टी हे जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हा परिषदेने त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. कलशेट्टी म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना आमची जिल्हास्तरीय समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मूल्यमापनसाठी आली होती. त्यावेळी आंबडोस गाव प्रथम आला होता. त्यावेळी मी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा फिरलो होतो. त्यानंतर शासनाने माझी हागणदारीमुक्त अभियानच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम जवळून पाहिले आहे.
यानंतर शासनाने पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजना आणली. यातही सिंधुदुर्ग पुढे होता. कर वसुली, शौचालय उभारणी ही कामे मोठ्या स्वरुपात केल्याने जिल्ह्याला हे यश मिळाले. यामुळे हा जिल्हा माझे नेहमीच आकर्षण राहिले आहे. वेंगुर्ला नगर परिषदेने सांडपाणी व्यवस्थापन व कचरा निर्मूलन यामध्ये केलेले काम राज्यातील मोठ्या नगरपालिकांनी करावे, असे आपल्याला वाटते.
राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक व भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात यासाठी वेगळे नियोजन अपेक्षित आहे. स्वच्छतेत जिल्ह्यातील नागरिक जागरुक आहेत. ९० टक्के नागरिक पाणी नमुने तपासणी करून घेतात. आता सिंधुदुर्ग जिल्हा जलजीवन मिशनचे काम चांगले करेल अशी अपेक्षा आहे, असे शेवटी डॉ. कलशेट्टी म्हणाले.