ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे ‘दिवाळे’

By admin | Published: November 11, 2015 10:06 PM2015-11-11T22:06:40+5:302015-11-11T23:39:10+5:30

अवकाळीने हिसकावला तोंडचा घास : शेतकरी हवालदील, सरकारने तातडीने मदत करण्याची गरज--लोकमत विशेष

'Diwali' of farmers in Diwali | ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे ‘दिवाळे’

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे ‘दिवाळे’

Next

रजनीकांत कदम -- कुडाळ  जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने काढून घेतल्याने या शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीतच दिवाळे निघाले आहे. तरी महामागाईच्या भस्मासूरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेले भात पाऊस पडल्याने रानातच आडवे झाले. तर काही ठिाकाणी कापलेले भातपिक भिजून खराब झाले आहे.
सलग तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीमध्ये पाणी साचले. पिकलेले आणि कापायला आलेले भाताचे पीक अगोदरच लोंबकळत होते. पण या पावसामुळे व पावसासोबतच्या वाऱ्यामुळे शेतात पडून पावसाच्या पाण्यात डुंबले आहे. त्यामुळे ते भात सर्रास खराब झाले. काही ठिकाणी भिजलेले हे भात काळे पडले आहे तर काही ठिकाणी भातशेतीच कुजून गेले आहे. शेतीतून काहीच उत्पन्न आले नसल्याची स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. या परिस्थितीने येथील शेतकरी उदासिन झाला आहे.


शेतकरी त्रस्त : विस्कळीत वातावरण, निसर्गचक्र बदलल्याचा फटका
निसर्गचक्र बदलल्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत असून, देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार नेहमीच उदासिनता दाखवित आहे. त्यामुळे नुकसान किती झाले, हे सांगून उपयोग काय? नुकसान भरपाई मिळत नाही.
त्यामुळे किती नुकसान झाले हे सांगण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. तर ते असलेली थोडीफार शेती वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत.
जूननंतर जुलै महिन्यात गायब झालेला पाऊस व त्यामुळे लांबणीवर पडलेली भातशेतीची लागवड व नंतर पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे जिल्ह्यात यावर्षी भातशेतीची लागवडही काही प्रमाणात घटली.
पण ज्यांनी ही लागवड केली त्यांना हंगामाच्या सरतेशेवटी आलेल्या पिकाची आशा लागून होती. भातकापणी झोडणीचा हंगामही जोमात सुरू झाला होता.
दरम्यानच परतीच्या अवकाळी पावसाने भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी केल्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडून गेले.
महागाईला तोंड देताना सामान्य लोक हैराण झाले असताना अशा काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची काय अवस्था होईल, याचा विचार करून येथील भातशेती करणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नोंदणी करणे सर्र्वाच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे बनले आहे.

Web Title: 'Diwali' of farmers in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.