मंदीतही दिवाळी प्रकाशमय!

By admin | Published: November 16, 2015 09:29 PM2015-11-16T21:29:55+5:302015-11-17T00:06:11+5:30

लोटे - परशुराम औद्योगिक वसाहत : परंपरा जपत कामगारांना बोनसचे वाटप

Diwali light in the fall! | मंदीतही दिवाळी प्रकाशमय!

मंदीतही दिवाळी प्रकाशमय!

Next

सुनील आंब्रे -- आवाशी --सध्या देशासह जगभर मंदीची लाट उसळली आहे. वाढती महागाई, उत्पादनाला नसलेली मागणी, कमी झालेला पाऊस व त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती यावर मात करत किंबहुना सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन लोटे - परशुराम (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी प्रतीवर्षाची परंपरा कायम राखली. कामगारांप्रती सहानुभूती दर्शवत सर्व कामगारांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस दिल्याने या कामगारांची दिवाळी प्रकाशमय झाली.
खरंतर ब्रिटीश काळापासून वर्षाचे बाराही महिने काम करणाऱ्या मजुराला दिवाळी सणानिमित्त एका महिन्याचा पगार बक्षीस देण्याची प्रथा सुरु झाली. कालांतराने ब्रिटीश राजवट संपुष्टात आल्यानंतर स्वतंत्र भारताने त्याला ‘बोनस’ असे गोंंडस नाव देऊन ही परंपरा आजही सुरु ठेवली. मात्र, मागील काही वर्षापासून जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असणारी देशाची आर्थिक व्यवस्था व त्याचा उद्योजकांना बसणारा फटका याचा विचार करता पुढील वर्षी आपल्याला बोनस मिळेल की नाही याची कामगारांना चिंता तर माझ्या कामगारांना यावर्षी बोनस देऊ शकेन की नाही? ही उद्योजकांची विवंचना सध्या दिसून येत आहे.
लोट्यातील ९९ टक्के उद्योग हे रासायनिक असल्याने शेतीवर आधारीत उत्पादने घेतात. यावर्षी कमी झालेला पाऊस व त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती याचा परिणाम या उद्योगांवरही जाणवत आहे. लघुउद्योजक तर काही मोठ्या कंपन्यांच्या जॉबवर्क वर अवलंबून असतात. मात्र, बहुतांश मोठ्या कंपन्या या सध्या मंदीच्या गर्तेत असून, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मोठ्या कंपन्यांचे तर अनेक प्लँट मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. काही छोटे उद्योजक तर कामगारांना विनाकाम रोजगार देत आहेत.
त्यामुळे यावर्षी बोनस मिळणार की नाही या विवंचनेत अनेक कंपन्यांचे कामगार असल्याचे दिसून आले. मात्र, वर्षभर काम करणाऱ्या कामगाराला आपला हक्काचा बोनस मिळाला पाहिजे या सकारात्मक विचारातून काही अपवादात्मक कंपन्या वगळता बहुतांशी उद्योजकांनी कामगारांना बोनस देऊन त्यांची दिवाळी प्रकाशमय केली. याबाबत अधिक माहितीसाठी काही नामांकित व लघुउद्योजक यामध्ये वाशिष्टी डिटर्जंट लिमिटेड, एस. आय. ग्रुप (इं.) लि., पेन्टोकी आॅर्गेनिक (इं.) लि., आय. ओ. एल., एम्को पेस्टीसाईडस्, दीपक कलर केम, श्रेया केमिकल, रॅलीज इंडिया लि., डी. नोसील, क्रॉमेटिक, एम. आर. फार्मा, दीपक केमटेक्स, पार्को आॅरगॅनिक, श्वास केमिकल, बहार अ‍ॅग्रो, कोकण सिंथेटिक्स, एस. आर. ड्रग्ज वा अन्य कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

कंपनी आपल्या परीने मंदीचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कामगारांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी दिवाळीपूर्वीच बोनस दिला.
- संदीप खोपकर,
एच. आर. मॅनेजर, कन्साई नेरोलॅक पेंटस् लि.

आमचे लोटे व गाणे खडपोली अशी दोन्ही युनिट मिळून एकशे एक कर्मचारी आहेत. सर्वांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला आहे.
- अशोककुमार पाटील,
डी. जी. एम. वर्क ., कृ ष्णा अ‍ॅण्टी आॅक्सिडेंट प्रा. लि.

आर्थिक परिस्थिती बेताची असून, कर्ज काढून कंपनी चालवली जात आहे. त्यामुळे बोनस देणे शक्य नाही.
- श्रीराम खरे,
डायरेक्टर, रुपल केमिकल

आम्हाला सध्या सर्वच ठिकाणी मंदीचा सामना करावा लागत आहे. तरीही आम्ही सर्व कामगारांना बोनस दिला आहे.
- एम. एम. सय्यद,
जनरल मॅनेजर, श्रेयस इंटरमिडीएटस् लि.

कंपनीला नफा असेल तरच बोनस दिला जातो. मागील आॅक्टोबर महिन्यात एक किलोदेखील माल विकला गेला नसल्याने आम्ही कामगारांना इन्सेंटीव्ह देऊ शकलो नाही.
- राजेश तिवारी,
जनरल मॅनेजर, आॅपरेशन कोरोमंडल अ‍ॅग्रीको. प्रा. लि.

आमच्या कंपनीच्या उलाढालीचा आलेख पाहता कंपनी यावर्षी पन्नास टक्के नुकसानात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळीपूर्वी दसऱ्यालाच कामगारांना २० टक्के बोनस दिला आहे.
- अ‍े. सी. भोसले,
सिनीअर मॅनेजर, घरडा केमिकल्स लि.
कंपनी व कामगार यांच्यातील समन्वय उत्तम असल्याने कामगारांना त्यांच्या हक्काचा बोनस दिला आहे.
- सुनील प्रजापती,
अ‍ॅडमिन आॅफीसर, फिल्ट्रा कॅटेलिस्ट

माझ्या तीनही युनिटमधील सर्व कामगारांना नियमानुसार बोनस दिला आहे.
- मिलींद बापट, डायरेक्टर, स्रेहलता, नंदादीप व मित्रा केमिकल प्रा. लि.

आम्ही कंपनी कामगारांना २० टक्के व कंत्राटी कामगारांना ८.३३ टक्के इतका बोनस दिला आहे.
- कंपनी व्यवस्थापन सूत्र, ए. बी. मौरी लि.

कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक असूनही आम्ही दरवर्षीप्रमाणे बोनस दिला आहे.
- डी. अ‍े. जाधव, डायरेक्टर, सहस्त्र केमिकल प्रा. लि.

आमचेकडे कामगार ही नियुक्तीच नाही. कंपनीत साडेतीनशे लोक हे क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करतात. त्यामुळे बोनस देण्याचा प्रश्नच येत नाही.
- सचिन खरे,
एक्झीक्युटीव्ह, पी. आर. ओ., विनती

कंपनी आर्थिक अडचणीत असूनही दोन्ही युनिटमधील कामगारांना बोनस अदा करण्यात आला आहे.
- प्रकाश पाटील,
फॅक्टरी मॅनेजर, ओंकार स्पेशालिटी

खरंतर दहा हजाराच्या आत ज्यांचा बेसीक आहे, त्यांनाच बोनस दिला जातो. मात्र, तरीही आम्ही सर्व कामगारांना सरसकट सानुग्रह अनुदान दिले.
- एस. वाय. पाटणकर,
एच. आर. अ‍ॅडमिन आॅफीसर, एक्सेल इंडस्ट्रिज लि.

मागील काही वर्षापासून कंपनी मृतावस्थेत होती. मागील वर्षभरापासून नवीन मालकांनी ती पुनर्जिवीत करण्याचे धाडस केले आहे. तरीही सर्वच्या सर्व म्हणजे शंभरहून अधिक कामगारांना आम्ही नियमानुसार बोनस दिला आहे.
- दिनेश कदम,
फॅक्टरी मॅनेजर, रिव्हरसाईड इं. लि.

आम्ही औषध उत्पादनात असलो तरी मंदीची झळ आम्हालाही पोहचत आहे. मात्र, परंपरा कायम राखत सर्व कामगारांना बोनस दिला आहे.
- के. एस. सावंत,
एच. आर. मॅनेजर, यु.एस.व्ही.लि

आर्थिक वर्षावर आधारीत लावलेल्या निकषावर जे कामगार बोनस घेण्यास पात्र असतात अशा सर्वांना आम्ही तो दिला आहे.
- अजय मेहता,
डायरेक्टर, योजना केमिकल प्रा. लि..

कंपनी व ठेकेदारी मिळून एकूण तीनशे पस्तीस कामगार आहेत. त्यांना नियमानुसार दिवाळीपूर्वीच बोनस देण्यात आला.
- ए. एन. तवर,
व्हाईस प्रेसीडेंट, सुप्रिया लाईफसायन्सेस लि.

आम्ही दरवर्षीप्रमाणे सर्वांनाच बोनसचे वाटप केलेले आहे.
- कैलास घोसाळकर,
फॅक्टरी इन्चार्ज, गरुडा केमिकल्

चेहऱ्यावर समाधान
जागतिक मंदीचे वारे वाहत असतानाही लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपनी मालकांनी दिवाळी सणात कामगारांना बोनस देण्याची परंपरा खंडित केली नाही. त्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.ा

Web Title: Diwali light in the fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.