ज्ञानेश्वर लोकरे फरार घोषित
By admin | Published: May 4, 2016 11:25 PM2016-05-04T23:25:03+5:302016-05-04T23:46:50+5:30
आंबोली नांगरतास स्फोट प्रकरण : उर्वरित चार आरोपींची निर्दोष मुक्तता
सिंधुदुर्गनगरी : आंबोली नांगरतास चेकमेट स्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी ज्ञानेश्वर लोकरे याला बुधवारी येथील जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी फरार घोषित केले. या प्रकरणातील दुसरा आरोपी मृत झाला आहे, तर उर्वरित चार आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास येथे ११ सप्टेंबर २००७ रोजी बँकेची कॅश घेऊन गोव्याकडे जाणारी गाडी लुटण्यासाठी लावलेल्या बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. वरील तारखेला दुपारी १.३० च्या सुमारास कानूर खुर्द (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील रजनीकांत मनोहर पाटील व दत्तात्रय तुकाराम गावडे हे पल्सर मोटारसायकल घेऊन आणि अशोक महादेव गावडे व संजय जानबा गावडे हे दोघे यामाहा मोटारसायकल घेऊन गणपती सणासाठी लागणारे पारंपरिक सामान गोळा करण्यासाठी नांगरतास घाणीचा आंबा याठिकाणी गेले होते.
हे सर्वजण साहित्य गोळा करत असतानाच त्यांना सावंतवाडी-बेळगाव या रस्त्यावरच नांगरतास येथे मोरीच्या बाजूला एक हिरो होंडा
मोटारसायकल आढळली. त्याचबरोबर रस्त्यावर एम एच ०९-एच २७११ हा ट्रक उभा दिसला. हाच ट्रक कानूर बाजारपेठेत चार दिवस उभा होता. त्यामुळे या ट्रकबाबत संशय आल्याने ते चारहीजण त्या ट्रकच्या दिशेने गेले. याचवेळी मोठा स्फोट झाला आणि यात संजय गावडे आणि अशोक गावडे हे दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले तर दत्तात्रय गावडे हा मोरीच्या खाली पडला. हे तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच रस्त्याला मोठा खड्डाही पडला.
या सर्व जखमींना बेळगाव येथे रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर दहा मिनिटांनी घटनास्थळी चेकमेटची गाडी दाखल झाली आणि हा कट उघड झाला. या स्फोटातील जखमी संजय गावडे आणि दत्तात्रय गावडे हे मृत झाले होते.
या स्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माउली जगन्नाथ लोकरे (वय २५) याच्यासह संतोष उर्फ सीताराम अरविंद हेगडे (वय २०, रा. पंढरपूर), हनुमंत निवृत्ती बोराटे (वय २२, रा. कुर्डुवाडी, सोलापूर), विजय सौदागर लोकरे (वय २५, रा. मोहोळ-सोलापूर), राजाराम आप्पा दाहिगुडे (वय ३५, रा. मोहोळ, सोलापूर) आणि सचिन उर्फ सतीश तुकाराम खरात (वय २०, रा. सोलंकीवाडी, सोलापूर) अशा एकूण सहा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
४0 साक्षीदार तपासले
या प्रकरणात एकूण ४० साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणातील पहिला साक्षीदार १३ आॅक्टोबर २०१० रोजी तपासण्यात आला. गेली सहा वर्षे या प्रकरणाची सुनावणी चालली आणि बुधवारी या प्रकरणाचा निकाल लागला. यात जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी प्रमुख आरोपी ज्ञानेश्वर लोकरे हा पोलिसांना अद्याप सापडून न आल्याने त्याला फरार घोषित केले, तर दोन नंबर आरोपी संतोष हेगडे हा मृत झाल्याने त्याला या खटल्यातून वगळण्यात आले, तसेच उर्वरित हनुमंत बोराटे, विजय लोकरे, राजाराम दाहिगुडे आणि सचिन खरात या चारही जणांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. संशयित आरोपींच्यावतीने अॅड. राजेंद्र रावराणे व अॅड. बापू गवाणकर यांनी काम पाहिले.