डॉक्टरांनी अहवाल ठेवला राखून!
By Admin | Published: February 3, 2015 11:35 PM2015-02-03T23:35:14+5:302015-02-03T23:59:08+5:30
शेतकरी खूनप्रकरण : पोलिसांच्या तपासातील प्रगतीला ‘ब्रेक’
खेड : खेड तालुक्यातील सुसेरी नं.२ या गावातील शेतकरी संतोष बाळकृष्ण केसरकर (५०) यांच्या सोमवारी आढळलेल्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. खेड नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांनी हा अहवाल तयार केला असून, सायंकाळी उशिरापर्यंत तो पोलिसांना प्राप्त न झाल्याने, केसरकर यांच्या मृत्युचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे.दरम्यान केसरकर यांच्या गळ्यावर मारहाण केल्याच्या कोणत्याही खुणा नसल्याचे, तसेच त्यांच्या पोटात अन्न नसल्याचे निष्पन्न झाल्याचे, डॉक्टरांनी सांगितल्याने केसरकर यांचा खून झाल्याच्या शक्यतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.याबाबतचा अहवाल राखून ठेवण्यात आल्याने पोलिसांचीही पंचाईत झाली आहे. दरम्यान, केसरकर यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सुसेरी नं.२ या गावातील संतोष केसरकर हे सोमवारी शेळ्या चारण्यासाठी घेऊन लगतच्या जंगलात गेले होेते़ सकाळी गेलेले केसरकर, सायंकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत असताना, गावातीलच खेमनाथ मंदिरानजीक असलेल्या रहाटीमध्ये त्यांचे शव आढळून आले होते़ त्यांनी ग्रामस्थांमार्फत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल केली. त्यांचे शव ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या गळ्यावर काही खुणा होत्या़ तसेच त्यांच्या गळयात सोन्याची चेन आणि हाताच्या बोटामध्ये असलेल्या दोन अंगठ्या गायब होत्या. त्यामुळे, सोन्याच्या दागिन्यांपायी कोणीतरी खून केल्याचा संशय पोलिसांनीही वर्तवला होता़ मात्र, मंगळवारी दुपारी २.३० वाजता खेड नगरपरिषदेच्या दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. हा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर केसरकर यांच्या पोटात काहीही अन्न नसल्याने त्यांचा मृत्यु झाला असावा, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, केसरकर यांच्या शवाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच केसरकर यांचा खून झाला अथवा नाही, किंवा खून झाला असेल तर कोणत्या कारणाने झाला, हे समजणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बेताची आर्थिक परिस्थिती असलेले हे कुटुंब केसरकर यांच्या निधनामुळे पोरके झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेडचे पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)