विनाशकारी प्रकल्पांना थारा देऊ नये
By admin | Published: February 19, 2015 09:54 PM2015-02-19T21:54:00+5:302015-02-19T23:50:13+5:30
आंबोलीत जनसुनावणी : इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत एकमुखी ठराव
आंबोली : आंबोलीच्या निसर्र्गसौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना आंबोलीत थारा देऊ नये, असा एकमुखी ठराव आंबोली येथील ग्रामपंचायतीत झालेल्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत घेण्यात आला.
आंबोली गावात इको-सेन्सिटिव्ह झोन हवा का नको, याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायतीच्या
सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. यावेळी सरपंच गजानन पालेकर, शशिकांत गावडे, दिनकर भिसे, तांत्रिक अधिकारी संजय सावंत, गौरव दळवी, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. अळवणी व ग्रामस्थ उपस्थित होते. आंबोलीला पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगात जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींमध्ये आंबोलीच्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीबाबतच्या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. परंतु, ग्रामस्थांनी या सुनावणीकडे पाठ फिरविली. केवळ आठ ते दहा ग्रामस्थ या सुनावणीला उपस्थित होते.
सरपंच पालेकर यांनी इको-सेन्सिटिव्हबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना आपण आपल्या विभागाशी संबंधित कोणती माहिती देणार आहात का, असे विचारले असता, संबंधितांनी वन, कृषी, महाराष्ट्र शासन यांच्या नावे असलेल्या जमिनींचे हेक्टरी क्षेत्र सांगितले. यानंतर ग्रामस्थ रामचंद्र गावडे यांनी आंबोलीत कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न न्यायालयात प्रविष्ट असताना इको-सेन्सिटिव्ह कोणत्या जमिनीला लावणार? असा प्रश्न करून, गेली २० वर्षे आम्ही आमच्या जमिनी मिळविण्यासाठी लढा देत असताना आपल्याकडून अशा जनसुनावण्या घेणे योग्य आहे का, असा सवाल केला. (वार्ताहर)
आंबोलीत १९६५ पूर्वीपासूनच्या घरांवर व जमिनींवर वन लागलेले आहे. त्यामुळे जरी राखीव वने इको-सेन्सिटिव्हमध्ये घ्यायची म्हटली, तरी ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या नावावर होत नाहीत, तोपर्यंत इको-सेन्सिटिव्हला आमचा विरोध राहील, असे ग्रामस्थांनी सांगितले.