राणेंच्या बँकेत मतांची ठेव नको

By admin | Published: February 15, 2017 10:40 PM2017-02-15T22:40:12+5:302017-02-15T22:40:12+5:30

देवेंद्र फडणवीस : कुडाळ येथील प्रचारसभेत आवाहन

Do not hold votes of Rane's bank | राणेंच्या बँकेत मतांची ठेव नको

राणेंच्या बँकेत मतांची ठेव नको

Next



कुडाळ : लोकशाही निवड प्रक्रियेत पाच वर्षांकरिता मतदार आपल्या आशा, आकांक्षा ठेवून मतदान करतो; मात्र मतदारांनी मतांची ठेव चांगल्या बँकेत ठेवली पाहिजे. नारायण राणेंची बँक दिवाळखोरीत आली आहे, त्यामुळे ती बुडीत आहे. तेथे मत ठेवले तर लुटले जाईल. आपले मत भाजपच्या बँकेत ठेवले तर पाच वर्षांत पाचपट विकास रूपाने आम्ही ते परत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुडाळ येथे बोलताना दिले.
तसेच सी-वर्ल्ड प्रकल्प, चिपी विमानतळ, मुंबई-गोवा महामार्ग, ६५0 कोटी रुपयांचा सिंधुदुर्ग किल्ला आराखडा, रेल्वेने पश्चिम महाराष्ट्राशी जोडून वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. यातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित केला जाईल. यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी सिंधुदुर्गवासीयांना दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणूक प्रचारार्थ भाजपची जाहीर प्रचारसभा कुडाळ येथील एस. टी. आगाराच्या मैदानावर बुधवारी झाली. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर, काका कुडाळकर, अतुल काळसेकर, अतुल रावराणे, आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे काँग्रेसचे राहुल गांधी, नारायण राणे यांची दिवाळखोरीत चाललेली बँक आहे. या बँकेत मतरूपी ठेव ठेवलात तर ती लुटली जाईल, ार दुसरीकडे नरेंद्र मोदी, सुरेश प्रभूंसारखी भाजपची बँक आहे. या बँकेत मतरुपी ठेव ठेवल्यास तुम्हाला पाच वर्षांत विकासाच्या रूपाने ती दुप्पट मिळेल.
देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७0 वर्षे होत आलीत. देशासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही तेच प्रश्न आहेत. देशात आणि राज्यात गेली वर्षानुवर्षे त्यांनी शासन चालविले म्हणून अशी अवस्था झाली आहे. यात शासनकर्ते मोठे झाले. ५0 वर्षांत त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विकास झाला. आपण आहे तेथेच राहिलो. शासनकर्त्यांनी काम करीत असताना मूलभूत सोयी-सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)
चौकट ४
शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल
काँग्रेसच्या काळात महाराष्ट्र राज्य शैक्षणिकदृष्ट्या देशात अठराव्या क्रमांकावर होते. गेल्या दोन वर्षांत प्रगत शैक्षणिक उपक्रम शासनातर्फे राबविले जात आहेत. यात राज्यभरातील १७ हजार शाळा डिजिटल करण्यात आल्या. त्यामुळे सध्या महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. गेल्या वर्षभरात पाच हजार मुलांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. येत्या दोन वर्षांत प्रत्येक गावापर्यंत इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. महानेट कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींना फायबर केबलद्वारे जोडण्यात येणार आहे. प्रत्येक गावात कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे.
प्रकल्पांची नुसती भूमिपूजने
नारायण राणे यांनी पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम केले; मात्र सिंधुदुर्गात एकही प्रकल्प ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या हातून प्रकल्प पूर्ण होणार नव्हते. नियतीला ते मान्यही नव्हते. आता आमच्या सरकारला दोन वर्षेच झाली. आम्ही प्रकल्पाची कामे सुरू केली आहेत. येत्या काही वर्षांत ती पूर्णदेखील होतील.
शिवसेनेबाबत
चकार शब्द नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुडाळमधील जाहीर प्रचार सभेतील संपूर्ण भाषणात शिवसेनेबाबत एक चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे सिंधुदुर्गात काही ठिकाणी शिवसेनेशी भाजपच्या झालेल्या छुप्या युतीला मुख्यमंत्र्यांचा
पाठिंबा होता की काय? असा प्रश्न उपस्थित होत होता.
तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती का?
सिंधुदुर्ग स्वच्छ जिल्हा झाला. साक्षर झाला. आता हा जिल्हा डिजिटल होईल. देश बदलतो आहे, राज्य बदलते आहे. तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती का?
जिल्हा परिषदेत स्वच्छता घडवा
सिंधुदुर्ग स्वच्छ व सुंदर जिल्हा बनविला. त्यामुळे आपण देशात प्रथम आलो. पारदर्शक प्रशासन द्या. केंद्र व राज्य सरकारच्या विचारांचे सरकार जिल्हा परिषदेवर आणा, असे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गवासीयांना केले. तसेच आम्ही आधी करतो आणि नंतर बोलून दाखवितो, असा टोला प्रभू यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.

Web Title: Do not hold votes of Rane's bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.